– विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्यावर, पोलिस व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
लोणार (वाजेद शेख) – विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्वतंत्र नियमावली करण्यात आली आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये परिवहन समितीच्या बैठका हा संशोधनाचा विषय झाला आहे. तर स्कूलबस, व्हॅन, रिक्षामधील विद्यार्थी संख्येसह शुल्कावरही कोणाचे नियंत्रण राहिले नाही. विशेष म्हणजे, आरटीओचेदेखील या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
शहर व परिसरात प्रत्यक्षात स्कूलबस किंवा व्हॅन म्हणून नोंदणी नसलेली वाहने गेल्या काही वर्षापासून वाहतूक करताना दिसत आहेत. तर अनेक वाहनात मेंढरे भरल्याप्रमाणे विद्यार्थी भरले जात आहेत. अशी विद्यार्थी वाहतूक करण्यात क्रुझर जीप, टमटमसह रिक्षांचाही मोठा उपयोग केला जात आहे. या वाहनांची आरटीओकडून ना पोलिसांकडून तपासणी केली जाते. आपल्या पाल्याच्या सुरक्षित वाहतुकीबाबत अनेक पालकही उदासीन असल्याचे वारंवार दिसून आले आहे. विद्यार्थी वाहतूक नियमावली नुसार वाहनांचा वेग ताशी ४० कि. मी. पेक्षा जास्त असू नये. तर पालिका हद्दीबाहेर ही वेगमर्यादा ताशी ५० कि.मी. इतकी आहे. मात्र सर्वजण याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. गाड्यांमध्ये अग्निरोधक यंत्र नाही. प्रथमोपचार पेटी नाही. प्रत्येक बसमध्ये विद्यार्थ्यांची नावे, संपर्क क्रमांक असणे बंधनकारक आहे. पण या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. बुलढाणा प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कडे नोंदी असणार्या स्कूलबस व व्हॅनच्या नोंदी पेक्षाही जास्त विनानोंदणी विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनांची संख्या मोठी आहे. याकामी आरटीओ कार्यालयाचा मोठा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. परिवहन समितीचे अध्यक्ष हे शाळा मुख्याध्यापक आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. शालेय मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबा निश्चिती, वाहनांची कागदपत्रे, प्रथमोपचार, अग्निशमन यंत्रणा याची पडताळणी करणे. समितीची तीन महिन्यातून किमान एकदा आणि प्रत्येक सत्र सुरू होण्यापूर्वी बैठक घेणे आवश्यक आहे.
अशी हवी स्कूलबस…
विद्यार्थी वाहतूक करणार्या शाळा प्रशासनाने मुला-मुलींची योग्य रकमेची सर्वसमावेशक विमा पॉलिसी काढावी. प्रशिक्षित चालक, एक पुरूष व एक महिला परिचर ओळखपत्र व स्वतंत्र गणवेश असावा. प्रथमोपचार पेटी आणि आवश्यक औषधे आवश्यक. बसमध्ये किमान दोन अग्निरोधक यंत्रणा आवश्यक आहे. बसमार्ग, क्रमांक बसच्या दर्शनी भागावर लावावेत. बसमध्ये संगीत, गाणे लावू नये. बसमधील मुलांना कोणतेही खाद्यपदार्थ अथवा पेये देवू नयेत. परवानाधारक बस पिवळ्या रंगाच्या असतील. बसच्या समोर व मागे शालेय बस लिहावे. वाहनाच्या खिडकीखाली सर्व बाजूंना १५० मिमी रुंदीचा विटकरी पट्टा. वाहनांत मुलाचे नाव, वर्ग, पत्ता, रक्तगट, पालकांचा मोबाईल क्रमांकासह यादी असणे आवश्यक आहे.