– वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले व पथकाची धडक कारवाई, जिंतूरचे दोघे अटक
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्या गंधारी शिवारात अवैध सागवान घेऊन जाणारा ट्रक वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले व पथकाने दि. २३ फेब्रुवारीचे रात्री ४ वाजेदरम्यान पकडला व सागवानसह २ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त करून जिंतूर येथील दोघांना अटक केली आहे.
मेहकर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्या गंधारी बीटमधील गंधारी शिवारातून एक वाहन अवैध सागवान घेऊन जात असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांना मिळाली असता, तात्काळ सापळा रचून २३ फेब्रुवारी चे रात्री ४ वाजेदरम्यान त्यांनी वनकर्मचार्यांसह सदर वाहन टाटा ४०७ क्र. एमएच २८-बी ९६२१ सागवान मालाची वाहतूक करताना आढळले. सदर वाहन चालकाकडे सागवान लाकूड वाहतूक संदर्भात विचारणा केली असता, त्याचेजवळ कोणतेही वैध कागदपत्रे आढळून आली नाही. त्यामुळे सदर वाहनातील सागवान गोल ७८ नग, ३.३८६घनमीटर, किंमत २ लाख ३८ हजार ९४६ रू. एवढया रकमेचा मुद्देमाल वाहनांसह जप्त करून आरोपी शे.मुस्तखीम शे.नवाज व मोजीजबेग जमिलबेग दोघेही राहणार जिंतूर यांच्याविरुद्ध भारतीय अधिनियम १९२७ अंतर्गत कलम ४१,४२ नुसार वन गुन्हा क्रमांक१/२५ नुसार गुन्हा दाखल करून वरील दोघांना अटक केली आहे. ही धडक कारवाई उपवनसंरक्षक श्रीमती सरोज गवस, वैभव काकडे सहाय्यक वनसंरक्षक मेहकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवलेसह घाटबोरी वनपरिक्षेत्रातील कर्मचारी यांनी केली. पुढील तपास टिटवी वर्तुळचे वनपाल आर.व्ही निंबेकर करीत आहेत.