– अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींत सरकारने मतांपुरता वापर करून घेतल्याचा संताप
– लाभार्थी महिलांची जिल्ह्यात तपासणी सुरू; अपात्रांचा आकडा वाढण्याची शक्यता!
दुसरबीड (भगवान नागरे) – विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर सर्वाधिक परिणाम करणारी ‘गेम चेंजर’ ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमधील लाभार्थी महिलांची फेरतपासणी जिल्हाभरात सुरू असून, याचदरम्यान काही नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख ४७ हजार ४०५ लाडक्या बहिणींपैकी २३ हजार ७७८ लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत, त्यामुळे अपात्र ठरलेल्या या लाडक्या बहिणींना योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. ३.५४ टक्के लाडक्या बहिणी जिल्ह्यात अपात्र ठरले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात ६ लाख २३ हजार ६२७ पात्र लाडक्या बहिणी उरल्या असून, त्यांचीही तपासणी सुरू असल्याने अपात्रचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील महायुती सरकारने या लाडक्या बहिणींना दणादण पैसे टाकून त्यांची मते घेतली. त्यावेळेसच काटेकोरपणे अर्ज मंजूर-नामंजूर केले असते तर अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींनी त्यांची मते वाया घातली नसती, अशा भावना अपात्र ठरलेल्या संतप्त महिलांतून व्यक्त होत आहे.
महायुती सरकारला निवडणुकीत महाविजय मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेली ‘लाडकी बहीण योजना’ ही गेमचेंजर ठरली. त्यावेळी सर्रास सरसकट सगळ्याच महिलांना या योजनेचा लाभ घेतला. मात्र आता निवडणुका संपल्या. लाडकी बहीण योजना जाहीर करून जेव्हा ती सुरू झाली, तेव्हा त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध निकष निश्चित करण्यात आले होते. पण विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले.
– तालुकानिहाय अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणी –
१. बुलढाणा ७०,०५५ पैकी २०३१ अपात्र
२. चिखली ७०,११० पैकी २५०० अपात्र
३. देऊळगावराजा २९,४६८ पैकी १०३९ अपात्र
४. जळगाव जामोद ३९,०१५ पैकी ९४७ अपात्र
५. खामगाव ८१,६७९ पैकी २६४७ अपात्र
६. लोणार ३६,८५३ पैकी २६०३ अपात्र
७. मलकापूर ४२,७०९ पैकी १३८४ अपात्र
८. मेहकर ६९,२०६ पैकी २९२४ अपात्र
९. मोताळा ४०,३५२ पैकी १६३३ अपात्र
१०. नांदुरा ४५,८५९ पैकी १६१४ अपात्र
११. संग्रामपूर ३६,७६५ पैकी १३१९ अपात्र
१२. शेगाव ३९,५६५ पैकी १३७१ अपात्र
१३. सिंदखेडराजा ४५,७७९ पैकी १७३९ अपात्र
या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आणि महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाले, त्यामुळे पुन्हा सत्तेत आल्यानंतर पैसे द्यायचे कुठून? असा प्रश्न निर्माण झाल्याने लाडकी बहीण योजनेसाठी दिलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ज्या महिलांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे, ज्यांच्या नावावर चारचाकी वाहन आहे, ज्या महिला संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा योजनांचा लाभ घेतात. त्यांना आता लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे. बहुतांश अशा नियमात न बसणार्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. अपात्र ठरण्याचे सर्वात जास्त प्रमाण लोणार तालुक्यात ६.६० टक्के आहे तर सर्वात कमी प्रमाण जळगाव जामोद तालुक्यात २.४४ टक्के आहे.
तपासणीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे ज्या पात्र महिला नाहीत त्या ऑटोमॅटिक कॉम्प्युटर रिजेक्ट होत आहेत. ज्यांची वय ६५ वर्षापेक्षा जास्त झाले त्या अपात्र होत आहेत. जर चुकून आधार कार्डच्या नंबरमुळे एखाद्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले असतील तर त्यांनी परत करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.