– सिंदखेडराजा तालुक्यातील जनुना येथील एकनाथ पवार यांची करूण कहानी; दोन चिमुकल्या मुलींचाही ट्रकमध्येच सांभाळ!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – वर्ष २०२३ मध्ये त्यांनी कर्ज काढून महिंद्रा कंपनीचा ट्रक विकत घेतला. ट्रकमधील तांत्रिक बिघाडांमुळे अनेकदा ट्रक रस्त्यात उभा करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या साधनावरही परिणाम होतो. मात्र कंपनीकडून त्यांना कोणतेही सहकार्य मिळत नाही.ट्रकचे कर्ज फेडण्यासाठी महिन्याला ६८ हजार ५०० रुपयांचा हप्ता भरावा लागतो. इतके उत्पन्न मिळत नसल्यामुळे कुटुंबाला पैसे देऊ शकत नाही, त्यामुळे दोन चिमुकलींसह अख्खे कुटुंबच ट्रकमध्ये फिरता संसार करत आहे. पैशाची बचत होण्यासाठी ट्रकमध्येच संसार थाटण्याची वेळ सिंदखेडराजा तालुक्यातील जनुना येथील एकनाथ तुकाराम पवार आणि त्यांची पत्नी ललिता पवार यांच्यावर आली आहे. नशीब अतिशय कठोर परीक्षा घेत असले तरी, या दाम्पत्याने एकमेकांच्या साथीने परिस्थितीवर मात करण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे.
तालुक्यातील जनुना गावाचे रहिवासी असलेले एकनाथ तुकाराम पवार आणि त्यांची पत्नी ललिता पवार यांनी ट्रकमध्येच आपला संसार मांडला आहे. हे दाम्पत्य गेल्या दोन वर्षांपासून आपल्या कुटुंबासह ट्रकमधून प्रवास करीत असून, त्यांना तीन मुली आहेत. सर्वात लहान पाच वर्षांची असून, एक ७ वर्षाची आणि तिसरी ९ वर्षाची आहे. दोन मुली लहान असल्याने त्या ट्रकमध्ये सोबतच राहतात, तर मोठी मुलगी गावाकडे राहून शिक्षण घेते. याबाबत त्यांनी सांगितले, की आर्थिक परिस्थितीमुळे दैनंदिन गरजा पूर्ण होत नसल्यामुळे पत्नीचा हातभार लागावा, यासाठी तीदेखील सोबतच राहते. विशेष म्हणजे, पत्नीसुद्धा ट्रक चालविण्यासाठी मदत करते. आपल्या खडतर संसारासाठी हे कुटुंब पुणे ते नागपूरदरम्यान मालाची वाहतूक करतात. अनेक वेळा दोन वेळच्या जेवणाचीसुद्धा सोय होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. २०२३ मध्ये त्यांनी महिंद्रा कंपनीचा कर्ज काढून ट्रक विकत घेतला. ट्रकमधील तांत्रिक बिघाडांमुळे अनेकदा ट्रक रस्त्यात उभा करावा लागतो, पण कंपनी काहीही सहाय्य करत नाही. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या साधनावरही परिणाम होतो. ट्रकचे कर्ज फेडण्यासाठी महिन्याला ६८ हजार ५०० रुपयांचा हप्ता भरावा लागतो. इतके उत्पन्न मिळत नसल्यामुळे कुटुंबाला पैसे देऊ शकत नाही त्यामुळे कुटुंबच सोबत ठेवल्यामुळे पैशाची बचत होत असल्याचे एकनाथ पवार यांनी सांगितले.
कधी कधी इतका मानसिक दबाव येतो की एकनाथ पवार हे आत्महत्या करण्याचा विचारही करतात. त्यांची पत्नी ललिता पवार याही ट्रक चालवण्यात त्यांना साथ देतात. तसेच, त्यांना मानसिक आधार देतात. याशिवाय त्यांच्या पत्नी तीन मुलींना अभ्यासासाठी प्रेरित करतात. मात्र रस्त्यावर राहून मुलींना शिक्षण देणे आणि त्यांचे योग्य संगोपन करणे, ही आव्हाने वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.