– हिंदू समाज व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून चिखली पोलिसांत तक्रारअर्ज दाखल
– खामगाव चौफुलीवरील चक्काजामने वाहतूक काहीकाळ विस्कळीत!
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखलीच्या लोकप्रिय आमदार तथा विकासकन्या श्वेताताई महाले पाटील यांना अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर चिखली तालुक्यासह जिल्ह्यातील वातावरण संतप्त झाले आहे. आज दुपारी दोन वाजता सर्व हिंदू समाज व भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी चिखली पोलिस ठाण्यावर धडकले व पोलिसांत तक्रारअर्ज दाखल केला. या धमकीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त जमावाने केली. त्यानंतर शहरातील खामगाव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन सुरू झाले. या चक्काजाममुळे खामगाव, बुलढाणा, मेहकरकडे जाणारी वाहतूक ठप्प पडली होती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले व वाहतूक सुरूळीत झाली.
आमदार श्वेताताई महाले यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने चिखली शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, सर्वस्तरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. त्यानंतर आज दुपारी संतप्त हिंदू समाज व भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी चिखली पोलिस ठाण्यावर धडकले, त्यांनी पोलिसांत तक्रारअर्ज देत, आरोपीचा शोध घेण्याची व ताईंचे संरक्षण वाढविण्याची मागणी केली. त्यानंतर, दुपारी साडेतीन वाजता नागरिक खामगाव चौफुलीवर रस्त्यावर उतरले. त्यात भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह हिंदू समाजाचा सहभाग होता. या सर्वांनी तब्बल तासभर रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या सर्व बाजूने भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या विनंतीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, चिखली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. धमकीचे पत्र पाठविणार्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले असून, हे पथक आरोपीचा कसून शोध घेत आहे.
———–
भाजप नेत्या तथा चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांना जीवे मारण्याची धमकी!