– नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार्या जिल्ह्यातील पहिल्याच लोकप्रतिनिधी ठरल्या सौ. वर्षाताई गिरी
– आ. श्वेताताई महाले यांनी तब्बल ४० कोटींचा निधी देऊनही गावकर्यांनी कमी मते दिल्याने झाल्यात नाराज!
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील वाघापूर-अंत्री कोळी गट ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. वर्षाताई विठ्ठल गिरी यांनी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांना आपल्या गावातून कमी मते पडल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा सरपंचांकडे सुपूर्त केला आहे. आपल्या नेत्याला गावातून जास्त मते मिळवून देण्यात अपयशी ठरल्याची नैतिकता बाळगून राजीनामा देणार्या जिल्ह्यातील त्या पहिल्याच महिला उपसरपंच ठरल्या आहेत. आ. श्वेताताई महाले यांच्या माध्यमातून गावात तब्बल ४० कोटींचा निधी आणून विकासकामे मार्गी लावली. तरीदेखील अपेक्षित असे मतदान लोकांनी केले नाही, त्यामुळे त्या कमालीच्या नाराज झालेल्या आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासकीय अधिकारी तथा खासगी सचिव विद्याधर महाले यांनी गावांमध्ये येऊन अंत्री कोळी – वाघापूर हे गाव दत्तक घेतले होते, व या गावांमध्ये विकासकामांचा डोंगरदेखील उभा केला होता.
चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी अंत्री कोळी, वाघापूर गावासह या परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. त्यासाठी उपसरपंच सौ. वर्षाताई विठ्ठल गिरी यांनी पुढाकार घेतला होता. अंत्री कोळी – रायपूर रस्ता, वाघापूर-रायपूर रस्ता, आठ ते दहा शेतरस्ते ही कामे काही पूर्ण झाली तर काही होत आहेत. सिमेंट बंधारे बांधल्यामुळे शेतकर्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला, गावातील रस्ते, नाली अशी बरीच विकासकामे झाली आहेत. तसेच, अद्यापही मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. असे असतानादेखील अंत्री कोळी-वाघापूर या गावाच्या निवडणुकीची जबाबदारी असताना, श्वेताताईंना गावातून मतदान कमी झाले. गावातून राहुल बोंद्रे यांना ३८८ तर श्वेताताई महाले पाटील यांना ३०७ मते पडली. या कमी मतांची नैतिक जबाबदारी स्वीकारून सौ. वर्षा विठ्ठल गिरी यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंचांकडे सुपूर्त केला आहे.
विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी कमी मते दिली तरी नाराज न होता आमदार श्वेताताई महाले यांनी या गावासाठी एक कोटी रूपयांचे मंगल कार्यालय, गजानन महाराज मंदिरास वॉल कंपाऊंड देण्याचे मंजूर केले आहे. कोणतेही काम घेऊन गेल्यावर त्यांनी कधीच नकार दिला नाही. शेतरस्ते असू द्या, सिमेंट रस्ते असू द्या, नाली बांधकाम, समाज मंदिर असू द्या, समाज भवन, सिमेंट बंधारे असू द्या, कोणत्याही प्रकारचे काम घेऊन गेल्यावर विद्याधर महाले पाटील व आ. श्वेताताई महाले यांनी कधीही नाही म्हटले नाही. एवढं सर्व असतानासुद्धा या दोन्ही गावात मतदान कमी झाल्यामुळे सौ. वर्षाताई गिरी या नाराज झाल्या असून, त्यामुळेच त्यांनी राजीनामा देण्याचे पाऊल उचलले आहे. लोकं जर विकास पाहून मतदान करत नसतील, तर मग आपणही या पदावर राहणे योग्य नाही. त्याकरिता मी या पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढे मी श्वेताताई महाले पाटील यांच्यासोबत राहून ताईच्या माध्यमातून विकासकामे करत राहू, असे त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.