– वाघजाईतील पेयजल योजनेची उच्चस्तरीय चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई करा; ग्रामस्थांना पाणी द्या; आ. मनोज कायंदे यांचे झेडपी सीईओंना पत्र!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – वाघजाई, ता. सिंदखेडराजा येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून, अधिकारी व ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. त्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने, या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधित अधिकारी व ठेकेदारावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, व ग्रामस्थांना तातडीने पाणी द्यावे, या मागणीसाठी वाघजाईचे सरपंच गजानन सानप यांनी सोमवार (दि.१०) पासून जिल्हा परिषद बुलढाणा समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. तसेच, सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनीदेखील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पत्र लिहून वाघजाई गावातील राष्ट्रीय पेयजल योजनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच ग्रामस्थांना पिण्यास पाणी द्यावे, असे लेखी पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर या गावातील पाणी चांगलेच पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सविस्तर असे, की सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई ग्रामपंचायत अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून २०१८-२९१९ साली ग्रामस्थांकडून लोकवर्गणीतून गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठेकेदार कव्हळे याच्यामार्फत योजनेचे काम सुरू केले आहे. मात्र अद्यापही या योजनेतून या गावातील पाणी टंचाईची समस्या सुटली नसल्याने सदर योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने सदर योजनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार मनोज कायदे यांनी पत्राद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच, तात्काळ राष्ट्रीय ग्रामीण पेयजलचे अधिकारी व ठेकेदारावर गुन्हे दाखल न केल्यास गावाचे सरपंच गजानन सानप हे जिल्हा परिषद कार्यालयासमोर १० फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन त्यांनी यापूर्वी दि. २४ जानेवारीरोजी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांना दिले आहे. मौजे वाघजाई गावामध्ये आजरोजी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावकर्यांची पाण्यासाठी वणवण होत आहे. वाघजाई येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी ठेकेदारामार्फत सदर योजनेचे काम सुरु होवून पाच ते सहा वर्ष झालेले आहे व प्रशासन, ठेकेदार यांच्या चुकीमुळे गावाला पाच वर्षापासून पाणी मिळालेले नाही व शासनाचा अमाप पैसा खर्च झालेला दिसून येत आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यापासून गावाला काहीएक फायदा झालेला नाही ही योजना गावातील लोकवर्गणीचा हिस्सा भरुन गावाला काहीही फायदा झालेला नाही. तरी संबंधित उपअभियंता व ठेकेदार यांचेकडून सदर योजनेची रक्कम वसुल करावी व त्यांच्यावर गावाची फसवणुक केली म्हणून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी सरपंच गजानन सानप यांनी केली आहे. तसेच, संबंधित ठेकेदाराच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या असल्याने संबंधित ठेकेदाराने मला बीड जिल्हातील मस्साजोगच्या सरपंचांना जसे संपविले तसा तुला संपवीन, अशी धमकीही संबंधित ठेकेदाराने दिल्याची तक्रारही सरपंच सानप यांनी पोलिसांत दाखल केलेली आहे.