– चिखली तहसीलदारांकडून कार्यवाहीच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण आंदोलन स्थगित
– रस्ता न मिळाल्यास शेतकर्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा सरनाईक, राजपूत यांचा इशारा
चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील मौजे सोनेवाडी येथील गट नं.१० मधून गेलेला शेतरस्ता महसूल प्रशासनाने पोलिस संरक्षणात तात्पुरता खुला केला होता. परंतु, तो सोनेवाडी ते पांगरी सांडव्या लगतचा रस्ता कांताबाई शंकर डवळे या अडेलतट्टू महिलेने पुन्हा अडवल्याने तो खुला करण्यात यावा, या मागणीसाठी सोनेवाडी येथील जनाबाई काळे, कुशीवर्ताबाई शेळके, मंगलाबाई काळे, कमलबाई गुंजकर, शे. भिकुबी शे. मुनीर यासह शेतकरी महिलांनी दि.२४ जानेवारीपासून तलावाच्या सांडव्यामध्ये बेमुदत उपोषण सुरू केले होते. अखेर सातव्या दिवसी तहसीलदार संतोष काकडे यांच्या लेखी अश्वासनानंतर हे उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. नायब तहसीलदार खाडे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भाजपचे मंदार बाहेकर, सुनील पोफळे, सुधाकर तायडे यांच्यासह इतरांच्याहस्ते शरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. दरम्यान, मागण्यांची पूर्तता १५ दिवसांत न झाल्यास पुनश्च आंदोलन छेडण्याचा इशारा सोनेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य सुधाकर तायडे, सुधाकर शेळके यांच्यासह आदींनी दिला आहे.
सोनेवाडी ते पांगरी रस्ता यापूर्वीच तात्पुरत्या स्वरूपात खुला करण्यात आला होता. तसेच, पाचआणे रस्त्याचे आदेशही तहसील प्रशासनाने दिले होते. आमदार सौ.श्वेताताई महाले व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मध्यस्तीने प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत, ऑगस्ट महिण्यामध्ये सांडव्या लगतचा सोनेवाडी ते पांगरी जाणारा रस्ता खुलादेखील केला होता. परंतु, हाच शेतरस्ता कांताबाई डवळे या अडेलतट्टू महिलेने पुन्हा अडवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. त्यामुळे शेतकरी महिला प्राणांतिक उपोषणास बसल्या होत्या. याप्रश्नी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी उपोषणकर्त्या महिलांशी चर्चा करत, अधिकारीवर्गाची चांगलीच कानउघाडणी केली, व हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे सक्त आदेश दिले होते. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी उपोषणस्थळी भेट देत आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची वेळीत दखल न घेतल्यास शेतकर्यांसह तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, दि. ३१ जानेवारीरोजी दुपारी १२ वाजता तहसीलदार संतोष काकडे यांनी मध्यस्थी करत शेतकर्यांना तहसील कार्यालयात बोलवून घेत, योग्य कार्यवाही करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. दरम्यान, सातव्या दिवसी नायब तहसीलदार श्री खाडे यांनी उपोषणस्थळी भेट देत, उपोषणकर्त्या महिला व शेतकर्यांच्या मागण्या जाणून घेवून योग्य कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते महिला यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व भाजपचे पदाधिकारी यांच्याहस्ते शरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले.
यावेळी शेतकर्यांसह साखराबाई तायडे, कस्तुरबाई जंजाळ, अलकाबाई शिरसाठ, मंगलाबाई काळे, आशाबाई पवार, सुरेखा तायडे, स्वाती मेव्हणकर, सविताबाई काळे, जयश्री तायडे, वैशाली काळे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर तायडे, बबन काळे, ज्ञानेश्वर पंडित, सुधाकर शेळके, रुस्तुम शिरसाठ, अशोक काळे, भास्कर काळे, शिवाजी जंजाळ, राजेंद्र पवार, सतीश काळे, प्रकाश तायडे, शेख मुनिर, भास्कर काळे, माधव गुंजकर, रमेश शिरसाठ, शंकर जंजाळ, रायपूर पोलीस स्टेशनचे अनंत कळमकर, शे.अझरुद्दीन शे.काझी, ग्रामसेवक अनिरुद्ध खेडेकर, आरोग्य अधिकारी डॉ.सदावर्ते, आरोग्य सेवक कस्तुरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हद्द निश्चितीनंतर महसूल प्रशासन देणार रस्ता!
जलसंधारण विभागाची हद्दनिश्चिती नसल्याने शेतकर्यांना वारंवार रस्त्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे. सदरील प्रकरण मिटवण्याच्या दृष्टीने प्रशासन सरसावले असून, जलसंधारण विभागाने मोजणीचे पैसे भरणा केला असून, या गटाची भूमि अभिलेख विभागाकडून मोजणी होवून हद्द निश्चित केल्यानंतर रस्ताचा कायमस्वरूपी प्रश्न निकाली निघेल, ऐवढे जरी खरे असले तरी यामध्ये दिरंगाई किंवा चालढकलपणा झाल्यास आंदोलन छेडू, असा इशारा सुधाकर तायडे यांच्यासह शेतकर्यांनी दिला आहे.
प्रकृती खालवल्याने महिलांवर उपचार!
सात दिवस अन्नग्रहण केले नसल्याने दोन महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना चिखली येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचारानंतर पुन्हा या महिलांनी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. उपोषण सुटल्यानंतर यातील महिलांना उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तर उपोषणकर्ते दोन महिलांना सलाईन लावण्यात आलेले आहे. त्यांची प्रकृती स्थीर आहे.