– शेतकरी नेते सहदेव लाड यांच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्तांनी दिले खातेनिहाय चौकशीचे आदेश
– जिल्हाधिकारी बुलढाणा करणार सचिन जैयस्वालांची चौकशी
बिबी (ऋषी दंदाले) – सिंदखेडराजाचे तत्कालीन तहसीलदार सचिन जैयस्वाल यांच्या खातेनिहाय चौकशीची शेतकरी नेते सहदेव लाड यांची मागणी विभागीय आयुक्तांनी मान्य केली असून, जैयस्वाल यांच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दि.२२ जानेवारी २०२५ रोजी लेखी आदेश दिले आहेत.

सविस्तर असे, सिंदखेडराजा तहसीलचे तत्कालीन तहसीलदार सचिन जैयस्वाल यांनी सिंदखेडराजा तहसीलचा पदभार असताना ८५/२ च्या आदेशाचे व नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या आदेश केलेले आहेत, तसेच अवैध मुरूम, रेती वाहतूक करणार्या वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण करून शासनाचा महसूल बुडवलेला आहे व इतर बाबी तक्रारीत नमूद करून शेतकरी नेते सहदेव लाड यांनी १८ डिसेंबर २०२४ रोजी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सचिन जैयस्वाल यांची तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये जैयस्वाल यांच्यावर कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करावी, व त्यांनी कमावलेल्या संपत्तीची चौकशी करून, सदर बेकायदेशीर रित्या कमावलेली संपत्ती शासन दरबारी जमा करावी, व त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त अमरावती यांनी दि. २२ जानेवारीरोजी सिंदखेड राजाचे तत्कालीन तहसीलदार सचिन जैयस्वाल यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे लेखी आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या चौकशीकडे संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.