– शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या पाठपुराव्याला मोठे यश!
– आज दिवसभर खरेदी केंद्रांवर शेतकर्यांच्या लागल्या होत्या भल्यामोठ्या रांगा!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्यात सुरू असलेल्या नाफेड व इतर एजन्सींमार्फतच्या सोयाबीन खरेदीची मुदत आज (दि.३१) संपल्यानंतर खरेदी केंद्रांवर आज मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र सरकारकडे केली होती. तुपकरांच्या या मागणीची तसेच राज्य सरकारने दाखल केलेल्या प्रस्तावाची तातडीने दखल घेत, केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीला दि. 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आज राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतल्यानंतर या मुदतवाढीचा निर्णय सरकारने जाहीर केला.
सोयाबीन खरेदीची मुदत आज संपल्याने खरेदी केंद्रांवर एकच गर्दी उसळली होती. सोयाबीन खरेदीला सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, केंद्र सरकार नाफेडमार्फत दि. 6 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी करणार आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. सोयाबीनची खरेदी राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आज, दि. ३१ जानेवारी ही खरेदीची शेवटची तारीख होती. आम्ही कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेवून ती मुदत वाढवण्यासाठी मागणी केली होती. आमची विनंती मान्य करून पुढील ७ दिवसांची वाढ दिली आहे, अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली. शेतकर्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल. तुरीचीदेखील खरेदी होत राहील. ११ लाख टन सोयाबीनची खरेदी झाली आहे, गोडावून कमी पडत आहेत, असे मंत्री रावल म्हणाले. पुढे परिस्थिती आली तर पुन्हा खरेदीसाठी मुदतवाढीबाबत परिस्थिती पाहून घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मी सांगतो हे तुमचं हक्काचं सरकार आहे, सगळ्या शेतकर्यांचा माल हा खरेदी केला जाईल, अशी ग्वाहीदेखील रावल यांनी दिली.
राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली होती. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ५६२ खरेदी केंद्रावर २५ जानेवारीपर्यंत ७ लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टनपेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झालेली आहे. ३१ जानेवारीपर्यंत यामध्ये मोठी वाढ होणार आहे. अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्टे पूर्ण केले आहेत. काही शेतकर्यांचे सोयाबीन खरेदी करणे बाकी असल्याने तेथील लोकप्रतिनिधी यांच्यासह शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य व केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिले होते. त्यानुसार, रविकांत तुपकर यांच्या मागणीनुसार, केंद्र सरकारने वाढीव उद्दिष्टासह सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात, राज्य सरकारनेदेखील राज्यात ३१ तारखेनंतर सात दिवस सोयाबीन खरेदीची मुदतवाढ मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला होता.