– महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केली भगवानगडाची भूमिका!
– गडावरील मुक्कामात धनंजय मुंडे यांची मानसिकता समजून घेतली, तो ५३ दिवसांपासून मीडिया ट्रायल सोसतोय!
– देशमुख यांच्या हत्येतील आरोपींनाही मारहाण झाल्याचे मीडियाने दाखवले नाही, आरोपींची तशी मानसिकता का बनली?
– संकट काळात गड माझ्या पाठीशी उभा राहिला, मला शक्ती, ऊर्जा मिळाली – मंत्री धनंजय मुंडे
भगवानगड, ता. पाथर्डी (बाळासाहेब खेडकर) – धनंजय हा गुन्हेगार नाही, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ते शंभर टक्के गुन्हेगार नाहीत, हे मी ठामपणे सांगू शकतो. धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत याची पक्षातील नेत्यांनादेखील जाणीव आहे. धनंजय मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राजकीय स्वार्थापोटी सगळं केलं जात आहे. खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत, मुंडेंची पार्श्भूमी ती नाही. धनंजय मुंडे यांच्यावर असे संकट पहिल्यांदाच आले नाही. घर फुटले तेव्हादेखील धनंजय मुंडे यांनी भरपूर सोसले आहे. आतादेखील गेल्या ५३ दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू आहे. एखाद्या व्यक्तीने किती सोसावे? असा प्रश्न भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी उपस्थित करत, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची जोरदार बाजू घेत, त्यांच्या पाठीशी भगवानगड खंबीरपणे उभा असल्याचे नीक्षून सांगितले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यानंतर मुंडे यांनी गुरुवारी रात्री उशिरा भगवानगडावर धाव घेत राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे समाधीदर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. गडावरच रात्री मुक्काम करत महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन सर्व आपबिती महंतांना सांगितली. या भेटीनंतर महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांबद्दल पत्रकार परिषद भाष्य केले. या पत्रकार परिषदेवरून काहीजणांकडून डॉ. शास्त्रीजी यांची भूमिका व भाष्य योग्यपद्धतीने समजून न घेता, त्यांच्यावरही सोशल मीडियातून खालच्या पातळीवर टीका सुरू केली आहे. त्याबद्दल बहुजन समाजासह महंतांनी संयम बाळगला असल्याचे दिसून येत आहे.
महंत डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले, की ’आमच्यात राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक विषयांवर दोन अडीच तास चर्चा झाली. मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की तो मुलगा राजकीय घराण्यात जन्माला आला आणि सर्व पक्षात त्याचे मित्र आहेत. परंतु, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे. याप्रकरणी भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. जे गुन्हेगार असतील त्यांचा शोध सुरु आहे. ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली? हे मीडियाने दाखवायला हवं होते. धनंजय मुंडे हा खंडणीवर जगणारा माणूस नाही. त्यांची पार्श्वभूमी ती नाही’, असेही नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केले.
संतांनी इतक्या वर्षांपासून जातीवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ते घडवूनदेखील आणले होते. मात्र, काही राजकीय लोकांनी तो पुन्हा बाहेर काढला असल्याचे मला वाटते. यातून सामाजिक सलोखा बिघडला असल्याचा दावादेखील नामदेव शास्त्री यांनी केला. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. या सर्वांचा समाजावर भयंकर परिणाम झाला आहे. ज्या व्यक्तीला जातीवाद माहिती नाही, त्यालाही तो माहिती झाला. त्यामुळे कायमस्वरुपी सामाजिक सलोखा बिघडला असल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. संत ज्ञानेश्वरांपासून आजपर्यंत सर्व संतांनी जातीय सलोखा ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नावर आघात झाला असल्याचे नामदेव शास्त्री म्हणाले.
धनंजय मुंडे यांची मानसिक स्थिती मी जाणून घेतली असल्याचे सांगून ते म्हणाले, की धनंजय मुंडे यांच्या हाताला सलाईन लावलेली होती. धनंजय गुन्हेगार व्यक्ती नाहीत. त्यांची पार्श्वभूमीदेखील तशी नाही. तो एक राजकीय घराण्यातील व्यक्ती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या घराण्यातील व्यक्ती आहे. ते खंडणी घेऊन जगणारे व्यक्ती नाहीत. धनंजय यांच्या पाठीमागे भगवानगड भक्कमपणे उभा आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदयाचे नुकसान आहे. पक्षाचे जे नेते आहेत त्यांनादेखील याची जाणीव आहे. मात्र ज्या पद्धतीने सध्याचं राजकारण सुरू आहे. हा विषय इतका ताणला जातोय. पण कोणता विषय किती ताणायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्यावेळी घर फुटलं तेव्हा धनंजय मुंडेंनी खूप सोसलं आहे. आतापण ते ५३ दिवसापासून प्रचंड त्रास सहन करीत आहेत, असे सांगून भगवानगडाचा धनंजय मुंडे यांना ठामपणे पाठिंबा असल्याने न्यायाचार्य डॉ. महंत नामदेवशास्त्री यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, धनंजय मुंडे यांना महंत नामदेवशास्त्री यांनी भक्कमपणे पाठिंबा दिल्याने त्यांना फार मोठा आधार मिळाला आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जी भूमिका आहे, तीच भूमिका आमची असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, हेदेखील फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे.
ज्या आरोपींनी सरपंच धनंजय देशमुख यांची हत्या केली, त्या आरोपींचीदेखील एका अर्थाने बाजू मांडण्याचा प्रयत्न महंत नामदेव शात्री यांनी केला. त्या आरोपींची मानसिकतादेखील पाहायला पाहिजे होती. त्या आरोपींनादेखील पूर्वी मारहाण झाली होती, असा दावा नामदेव शास्त्री यांनी केला. हा त्यांच्या गावातील अंतर्गत विषय होता. त्याला मीडियाने मोठे केले असल्याचेही शास्त्री यांनी म्हटले आहे.
संकट काळात गड माझ्या पाठीशी उभा राहिला, मला शक्ती, ऊर्जा मिळाली – मंत्री धनंजय मुंडे
मंत्री धनंजय मुंडे यांनी कालरात्री भगवानगडावर जाऊन महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. रात्रभर त्यांच्याकडे मुक्काम केला. आज सकाळीच नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवला आहे. यानंतर आता धनंजय मुंडे यांनीही भगवानगडाचे आणि नामदेव शास्त्री यांचे आभार मानले. धनंजय मुंडे म्हणाले, ‘न्यायाचार्य बाबांनी मुलाखतीत सांगितलं की हा गड माझ्यासारख्या अतिशय सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा आहे, याच्यासारखी ताकद आणि शक्ती आणि बाबांचा विश्वास माझ्या पाठिमागे उभा करणं ही फार मोठी जबाबदारी आहे. हा गड गरिबातल्या गरीब माणसाच्या एक एक रुपयांतून मोठा झालेला गड आहे. त्यामुळे त्यांना ऐश्वर्यासंपन्न म्हटलं जातं. असा गड माझ्या संकटाच्या काळात उभा आहे. ही माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. इतकी मोठी शक्ती आहे की, त्याचं शब्दांत वर्णन करता येणार नाही.’ ‘हे संकट आज आलेलं नाही. ५३ दिवसांपासून आपण पाहताय इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियावरून मला टार्गेट करून मीडिया ट्रायल चालवलं जातंय. मी त्यात कोठेही एकही अवाक्षर बोललेलो नाही. संकट ५३ दिवसांचं होतं, मी इथे कधीही आलो असतो. पण मी त्या भावनेने येथे आलेलो नाही. तर मी मंत्री झालो आहे. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर भगवान गडाचं दर्शन घेतलं नव्हतं. आता मुंबईला जाण्याआधी त्यांचं दर्शन घेतलं’, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. मुक्कामकाळात डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी काय चर्चा झाली, यावर धनंजय मुंडे म्हणाले, ‘बाबा राजकीय चर्चा करत नाही, मीही त्यांच्याशी राजकीय चर्चा केली नाही. आमच्यात अध्यात्मिक चर्चा झाली. त्यांनी ज्ञानेश्वारीचे अनुभव सांगितले. ते ऐकल्यानंतर त्यातून आपल्याला काहीतरी मिळतं. ते जीवन जगण्यासाठी स्वतःसाठी आणि लाखो लोकांचं जीवन समृद्ध करण्याकरता त्याचा फायदा होतो.’ ‘न्यायाचार्य बाबांनी पंकजा मुंडेंना या गडाची कन्या ठरवलं आहे. मी या गडाचा निस्सिम भक्त आहे. संत भगवानबाबाचा मी निस्सिम भक्त आहे. शास्त्रीबाबांचा मी निस्सिम भक्त आहे. अशा ठिकाणी जिथे कायम श्रद्धा असते, आपण श्रद्धेने गेल्यानंतर आपल्या पाठिमागे ऊर्जा मिळते, असा गड पाठीमागे उभा राहतो, तेव्हा स्वाभाविक आपल्यामागे विश्वास निर्माण होतो’, असेदेखील धनंजय मुंडे म्हणाले.