– सिंदखेडराजा मतदारसंघातील परंतु चिखली तालुक्यातील २२ गावे चिखली मतदारसंघात समाविष्ट करणार!
– मंत्रालयीन अधिकारी तथा मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले पाटील यांची निसंदिग्ध ग्वाही
– लाडक्या लेकीसह जावयाच्या मेरावासीयांकडून अगदी राजेशाही थाटात गौरवशाली सत्कार!
चिखली (एकनाथ माळेकर) – खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाटाचा प्रश्न लवकरच मार्गी लावून, मेरासह या परिसरातील प्रत्येक शेतशिवारातील या पाटाचे पाणी मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशी निसंदिग्ध ग्वाही चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी दिली. तर, सिंदखेडराजा मतदारसंघातील परतु, चिखली तालुक्यात येणार्या मेरा गावांसह आंचरवाडी, देऊळगाव घुबे, मिसाळवाडीसह २२ गावांचा चिखली विधानसभा मतदारसंघात समावेश करण्यासाठी राज्य सरकार पातळीवर यशस्वी प्रयत्न करू, अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक तथा मंत्रालयीन प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांनी मेरावासीयांच्या हृदयसत्कारप्रसंगी दिली, व या भागातील नागरिकांच्या मागणीला मोठे पाठबळ जाहीर केले.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील या मेरा गावाच्या लाडकी लेक, तर श्वेताताईंना प्रोत्साहन देत जनतेचे नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून देणारे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे पती विद्याधर महाले पाटील हे मेरा गावाचे जावई. ताईंना दुसर्यांदा जनतेने आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, त्यांचा हा विजयोत्सव आणि विद्याधर महाले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून झालेली निवड असा दुग्धशर्करा योग साधत मेरावासीयांनी लाडक्या लेकीसह जावायाचा अगदी राजेशाही थाटात सन्मान केला. अगदी लग्नसोहळ्यासारखा हा हृदयसत्कार सोहळा पार पडला. मेरासह या भागातील २२ गावे ही विद्याधर महाले पाटील यांच्यावर अपार प्रेम करत असून, ही गावे चिखली मतदारसंघात समाविष्ट झाली तर या मतदारसंघातून ताईंना आचंद्र-सूर्य लीड मिळणार आहे. या मागणीला याप्रसंगी विद्याधर महाले पाटील यांनी बळ देऊन या भागातील लोकभावनेने मन जिंकले. मेरा बुद्रूक येथील सन्मान सोहळ्यात बोलताना विद्याधर महाले पाटील म्हणाले, की मेरासह सिंदखेडराजा मतदारसंघातील नागरिक गेल्या पाच वर्षापासून ही २२ गावे चिखली मतदारसंघात समाविष्ट करण्यासाठी वारंवार आमच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र काही शासकीय अडचणीमुळे ही गावे समाविष्ट करता आली नाहीत. तसेच मतदारसंघ वेगळा पडत असल्याने विकासकामे करतांना अडचणी निर्माण होत आहेत. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातीने लक्ष घालून पाठपुरावा करू आणि सिंदखेडराजा मतदारसंघातून ही २२ गावे चिखली तालुक्यात समाविष्ट करू, अशी ग्वाहीदेखील याप्रसंगी विद्याधर महाले पाटील यांनी दिली, त्याला टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी प्रतिसाद दिला.
आमदार श्वेताताई महाले यांनी सांगितले, की मला निवडून आणण्यासाठी माझ्या माहेरच्या सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येवून रात्रंदिवस एक करत जिद्दीने व चिकाटीने चिखली मतदारसंघातील गावोगावी जावून मतदान मागितले, आणि दोनदा आमदारपदावर मला विराजमान केले. मागील पंचवार्षिकपासून ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान दिले, काम मागितले नाही. परंतु एकीकडे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ हा वेगळा पडत असला तरी माजी आ. डॉ.राजेंद्र शिंगणे व डॉ.शशिकांत खेडेकर यांनी मला विरोध केला नाही. तरीसुध्दा जर ही २२ गावे माझ्या मतदारसंघात असती तर या गावांचे नंदनवन करून टाकले असते. पण आता शासनाच्या योजना प्रत्येकापर्यंत कशा पोहोचतील, याचा पाठपुरावा करेल. तसेच शेतकर्यांच्या वीजपंपाना २४ तास वीज मिळण्यासाठी गावात लवकरच ३३ केव्ही उपकेंद्राची उभारणी करण्यात येईल. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य यासारख्या विकासकामांबरोबरच माझ्या लाडक्या बहिणींसाठी, वयोवृद्धांसाठी निधी कमी पडू देणार नाही. योजना शासनाच्या असल्या तरी खेचून आणणारी आमदार तुमची लेक आहे. त्यामुळे पुढील दहा पिढ्या नाव राहील, असे विकासकामे करूया. यासाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष भेटून काम करून घेणे महत्वाचे आहे. पण यात महत्वाचा शेतकर्यांचा मोठा प्रश्न आहे, तो खडकपूर्णा पाटाचा तोही लवकरच मार्गी लावून मेरा शेतशिवारातील प्रत्येक शेतकर्यांना पाटाचे पाणी मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशी ग्वाही याप्रसंगी आ. श्वेताताई महाले यांनी याप्रसंगी या भागातील जनतेला दिली.
लाडक्या लेकीचा व जावयाचा याप्रसंगी अगदी राजेशाही थाट गावकर्यांनी केला होता. लग्नघरी जावयांचा जसा आदरतिथ्य मानपान केला जातो, त्या सन्मानापेक्षाही कैकपटीने हा सोहळा स्नेहभावाचा आणि नातेसंबंधांसोबतच माणुसकी जपणारा ठरला. महाले दाम्पत्याच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव तन मन धनाने एकत्र आले होते. त्यांचे गावात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी झाली. सत्कार सभेसाठी परिसरातून मोठा जनसागर उसळला होता. सत्कार करण्यासाठी तरुणाईपासून आबालवृद्धांपर्यंत गर्दी झाली होती. गावकर्यांनी त्यांची राजेशाही थाटात भव्य मिरवणूक काढली. त्यासाठी ब्रिटीशकालीन बनावटीच्या ‘रोजराइस’ या वाहनाची व्यवस्था मेरावासीयांनी केली होती. या वाहनातून अगदी राजेशाही थाटात मिरवणूक निघाली. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी प्रेमाच्या अक्षदा त्यांच्या डोक्यावर टाकल्या. हा आगळावेगळा गौरव सोहळा पाहून श्वेताताई व विद्याधर महाले अक्षरशः भारावून गेले.गावाच्या लेकीचा आणि लाडक्या जावयाचा ‘न भूतो न भविष्यती’ असा कौतुक सोहळा साजरा करताना मेरावासीयांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. मिरवणूक सुरू असतांना फाट्यावरील मारोती मंदिर, गजानन महाराज मंदिर, गावातील अण्णाभाऊ साठे पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, दर्गा, महादेव मंदिर, विठ्ठल रुख्माई मंदिर, हनुमान मंदिरात जावून विद्याधर महाले व श्वेताताई महाले यांनी दर्शन घेवून पुष्प अर्पण केले. त्याचबरोबर प्रत्येक घरातील महिला आपआपल्या घरापुढे कुंकू टिळा लावून औक्षण करत होत्या. जात, पात आणि कुठलाही भेदभाव न ठेवता तिनशे कुटुंबांतील सर्वधर्मीय सुहासिनींनी श्वेताताई आणि विद्याधर महाले यांचे औक्षण केले. अशा प्रकारचा सोहळा पंचक्रोशीतच काय पण राज्यात कुठेही झाला नसेल, असा हा सोहळा पार पडला.
