– देऊळगाव घुबे येथील राष्ट्रीय कीर्तनातून प्रबोधन; शेणफडराव घुबे हे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व!
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – आजच्या धावपळीच्या युगात देशातील तरूण भौतिक सुखाच्या नादात व्यसनाधीन होऊन विनाशाच्या वाटेवर आहे. संपूर्ण भारताचे आजचे चित्र पाहिले तर एकीकडे विज्ञानाचा गाजावाजा होत असतांना माणूस मात्र अंधश्रद्धेच्या आहारी जात असून, देवा-धर्माच्या नावाखाली एकमेकापासून दूर जात असल्याची भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपसातील प्रेम आटत चालले असून, युवापिढीला संस्काराची फार मोठी गरज आहे. संस्कारांच्या अभावामुळे वृद्धाश्रमात गर्दी वाढू लागली आहे. त्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जपण्याची गरज आहे. राष्ट्रसंतांनी ब्यान्नव वर्षापूर्वी अंधश्रद्धेवर प्रहार करित राष्ट्रवादाचे धडे आपल्या कीर्तनातून व प्रवचनातून दिले होते, असे प्रतिपादन करत, प्रपंचाच्या डबक्यात अखंड बुडालेल्या त्रस्त लोकांना अध्यात्माची प्रचंड गरज असल्याचे पाटसुल येथील सेवाश्रमाचे अध्यक्ष, राष्ट्रीय कीर्तनकार हभप. शुकदास महाराज गाडेकर यांनी सांगितले.
देऊळगाव घुबे येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या महनीय व्यक्तींना आदर्श जीवन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी आयोजित आपल्या राष्ट्रीय कीर्तनात हभप. शुकदास महाराज गाडेकर हे बोलत होते. या प्रसंगी सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला हार अर्पण करून, हभप. शुकदास महाराज गाडेकर यांचा भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेणफडराव घुबे यांच्याहस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. हभप. गाडेकर महाराज यांनी “मेरे प्यारे सुन्दर भारत पर दूश्मन कि नजर ना लगे अरे तू सुन !”, या ग्रामगीतेवरील तुकडोजी महाराजांच्या भजनाचे निरुपण करतांना शब्दांची चौफेर फटकेबाजी करीत उपस्थितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. ते म्हणाले, की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही आपल्याला संतवचनांचा विसर पडला आहे. रामायण, भागवत व धर्मग्रंथातील नीती समजून घेणे गरजेचे आहे. कर्म चुकले म्हणून महाप्रतापी रावण मारल्या गेला. जीवनाचं वर्म चुकलं म्हणून दुर्योधनासहीत बलाढ्य कौरव नष्ट झाले. सत्याची कास सोडून अहंकाराच्या वागणुकीमुळे संपूर्ण कौरव संपले. म्हणून अध्यात्माची कास धरून आपल्या वाट्याला आलेले कर्म प्रामाणिकपणे करा, म्हणजे जीवनात अपयश येण्याचे कोणतेच कारण नाही. आजकाल साधूंचे पेव फुटले. देवाच्या बाबतीत खोट्या बाबी रूजवून लोकांना अंधश्रद्धेकडे ढकलले जात आहे. भक्तीच्या नावावर लोकांना आमिष दाखवून लूटल्या जात आहे.
भक्ती भक्ती क्या करते हो
बिना आचरण भक्ती भी धोका है
म्हणून श्रोता आणि वक्ता जेथे एक होतो, तेथे खर्याअर्थानं भक्ती साकार होते. भक्तीसाठी शुद्ध भाव व मनाचा निर्धार पाहिजे. प्रत्येक जन प्रारब्धानुसार जगत असतो असं म्हटल्या जातं, हे थोडेफार खरं वाटत असलं तरी तुमचं कर्म तुमचं प्रारब्ध निर्माण करित असतं. म्हणून उचित काय, अनुचित काय हे ओळखून निरपेक्षपणे कर्म करित राहिल्यास कुठेच धोका नाही. विवाह संस्कृती वेगळ्या वळणावर वाटचाल करित असून, पती-पत्नी, भाऊ -भाऊ यांचा एकमेकावर विश्वास नाही. त्यातून अनैतिकता जन्म घेते. हाडामासाचा देह फार पुण्याईने प्राप्त होतो. त्या जन्माचं सोनं करता आलं पाहिजे. विद्यार्थीदशेमधे ज्ञान प्राप्त करण्याची हीच संधी उपलब्ध असते. तेंव्हा याच वयात ज्ञानार्जन करुन स्वतः चं व्यक्तिमत्त्व विकसित करुन मायबापांची सेवा करा, म्हणजे देशाची सेवा करण्याची क्षमता आपोआप निर्माण होईल. आज देऊळगाव घुबेच्या जानकीदेवी विद्यालयाच्या प्रांगणात पाऊल ठेवताच नवी ऊर्जा प्राप्त झाल्याची अनुभूती झाली. शेणफडराव घुबेदादा सारखं ऋषीतुल्य व्यक्तीमत्व आपल्यासाठी स्वतःला झिजवून महान व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींना शाळेवर आदर्श जीवन पुरस्काराच्या निमित्ताने आणून त्यांच्या कार्याची ओळख तुमच्यासमोर प्रस्तुत करून माझा विद्यार्थीदेखील गुणवान व्हावा, यासाठी झटत आहे ही तुमच्यासाठी अत्यंत भाग्याची बाब आहे. आज येथे वेगवेगळ्या क्षेत्रात ऊत्कृष्ट काम करणार्या गुणवान व्यक्तीबरोबर शाळेच्या गुणवान विद्यार्थ्यांंचाही सत्कार करण्यात आला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. असे आवर्जून सांगतांना शुकदास महाराजांनी शेणफडरावदादांच्या उत्तुंग कार्याचे तोंड भरुन कौतुक केले. या राष्ट्रीय कीर्तनासाठी गावातून व परिसरातून शेकडो बायाबापड्यांनी गर्दी केली होती. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून जानकीदेवी विद्यालय व रामकृष्ण इंग्लिश स्कूल या दोन्ही शाळांची वाटचाल सुरू असून, शाळेतील शिस्त व आदर पाहून आनंद होत असल्याबद्दल हभप. शुकदास महाराजांनी शिक्षकांबद्दल व सर्व सेवकाबद्दलही गौरवाने उदगार काढले. या कीर्तनाला उपस्थित जनसमुदयाचे प्रा. उद्धव घुबे यांनी आभार मानले.