Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraVidharbha

निवडणुकीच्या तोंडावर सरकारची साखरपेरणी; चार महिने ताटकळवले; आता पीकनुकसानीची मदत घोषित!

– १३ हजार ६०० प्रमाणे तीन हेक्टरपर्यंत मिळणार मदत; दोन वर्षांपूर्वीच्या नुकसानीच्या मदतीसाठी मात्र पायपीट!
– २० मार्चपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात मदत जमा करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश; प्रशासन लागले कामाला!
– शेतकरी नेते रविकांत तुपकरांना श्रेय मिळणार नाही याची सरकारने घेतली पुरेपूर काळजी!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठव़ड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे एक लाख ५७ हजार १८० हेक्टरवरील शेतीपिकांचे व शेतीचे नुकसान झाले होते. यासाठी राज्य सरकारने २२० कोटी ७६ लक्ष रूपयांचा मदतीचा निधी मंजूर केला आहे. नुकसानीमुळे शेतकर्‍यांना दिलासा म्हणून शासनाने अनुदानाची मर्यादादेखील दोन वरून तीन हेक्टरपर्यंत वाढविली असून, जिरायतीसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रूपये प्रमाणे मदत दिल्या जाणार आहे. सदर रक्कम २० मार्चपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ड़ॉ. किरण पाटील यांनी दिले असून, यासाठी तहसील प्रशासन कामालादेखील लागले आहे. असे असले तरी दोन वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी बरेच शेतकरी आजही संबंधित कार्यालयात चकरा मारतांना दिसत आहेत. धक्कादायक बाब अशी, की या पीकनुकसानीच्या भरपाईसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उग्र आंदोलन केले होते, तसेच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चादेखील काढला होता. परंतु, सरकारने ही मदत देण्यास मुद्दामहून उशीर केला असून, याचे श्रेय तुपकर यांना मिळणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात तुफान अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरासह इतरही पिकांचे तसेच शेती व फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाने १ लाख ५७ हजार १८०.९० हेक्टरवरील पिके व शेतीचे नुकसान झाल्याचे शासनाला कळविले होते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्याने या नुकसानीसाठी २२० कोटी ३४ लाख ७७ ह जार इतका निधी मंजूर केला आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील पाड़ळी, धाड़, म्हसला बुद्रूक महसूल मंडळातील १०८.९४ हेक्टर नुकसानीसाठी २ कोटी ९४ लक्ष, मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी, शेलापूर, मोताळा, बोराखेड़ी, रोहीणखेड़ मंड़ळातील १३१०१.३० हेक्टरसाठी १७ कोटी ८५ लाख ७१ हजार, चिखली तालुक्यातील चिखली, हातणी, उन्द्री, धोड़प, अमड़ापूर, पेठ, एकलारा, कोलारा, मेरा, शेळगाव आटोळ, चांधई मंड़ळातील २८ हजार ९९८.२३ हेक्टरवरील नुकसानीचे ३९ कोटी ४५ लक्ष ७१ हजार, मलकापूर तालुक्यातील दाताळा, धरणगाव मंड़ळातील ३४.६० हेक्टरवरील नुकसानीचे ९ लक्ष ३४ हजार, खामगाव तालुक्यातील पारखेड़, हिवरखेड़, लाखणवाड़ा, काळेगाव, जनुना, वझर, आवार मंड़ळातील १०५५.९२ हेक्टरवरील नुकसानीसाठी २५ कोटी २५ कोटी ३ लक्ष २९ हजार, संग्रामपूर तालुक्यातील पातुर्ड़ा मंड़ळातील १०.४०.हेक्टरवरील नुकसानीचे २ लाख ३१ हजार, मेहकर तालुक्यातील अंजनी, शेलगाव देशमुख, ड़ोणगाव, कल्याणा, हिवरा आश्रम, लोणीगवळी, मेहकर, जानेफळ, वरवंड़, नायगाव दत्तापूर, देऊळगाव माळी मंड़ळातील ३२ हजार ९८०.१४ हेक्टरवरील नुकसानीसाठी ४४ कोटी ८५ लक्ष ३० हजार, लोणार तालुक्यातील हिरड़व, टिटवी, सुलतानपूर, लोणार, बिबी, अंजनी बु. मंड़ळातील १२ हजार ३८३.७७ हेक्टरवरील नुकसानीसाठी १६ कोटी ९३ लक्ष ३० हजार, देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावराजा, तुळजापूर, मेव्हुणाराजा, देऊळगाव मही, अंढेरा मंड़ळातील २१ हजार ४९३ हेक्टरवरील नुकसानीसाठी ३१ कोटी २७ हजार तर सिंदखेड़राजा तालुक्यातील किनगावराजा, सोनोशी, दुसरबीड़, मलकापूर पांग्रा, साखरखेर्ड़ा, शेंदुर्जन, सिंदखेड़राजा महसूल मंड़ळातील ४७ हजार १४.६० हेक्टरवरील नुकसानीची ६८ कोटी २९ लक्ष ३२ हजार रूपये मदत देण्यात येणार आहे. सदर मदत २० मार्चपर्यंत संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ड़ॉ. किरण पाटील यांनी संबंधितांना दिले आहेत. त्यादृष्टीने तालुका प्रशासन कामाला लागले आहे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना युध्दपातळीवर काम करण्याचे आदेश दिल्याचे मेहकरचे तहसीलदार नीलेश मड़के यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.


  • सदर नुकसानीची मदत मिळण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र आंदोलने केली होती, व पाठपुरावा केला होता. आगामी निवड़णुका पाहता, शिंदे-फडणवीस सरकारला शेतकर्‍यांच्या खात्यात मदत जमा करण्याची घाई असल्याचे दिसत असले तरी दोन वर्षांपूर्वीच्या नुकसानीच्या मदतीसाठी बरेच शेतकरी संबंधित विभागात आजही चकरा मारतांना दिसत आहेत. त्यामुळे याकड़ेही लक्ष देणे गरजेचे आहे.
  • सन २०२२ मधील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची हेक्टरी ८ हजार ५०० रूपये मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. पण मेहकर तालुक्यासह काही ठिकाणी एकरी १२०० रूपये म्हणजे हेक्टरी ३ हजार रूपयेप्रमाणे मदत देण्यात आली. याबाबत शेतकर्‍यांनी रोष व्यक्त केला होता तर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सविस्तर व सड़ेतोड़ वृत्तदेखील प्रकाशित करून राज्य सरकारने लक्ष वेधले होते.

https://breakingmaharashtra.in/farmer_anger_on_govt/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!