शेतकर्यांसाठी जेलमध्येच काय, फासावरदेखील जाण्यास तयार!
– रविकांत तुपकरांना आशीर्वाद द्या; ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांचे आवाहन
– शेलसूर येथे तुपकरांवर जेसीबीने पुष्पवृष्टी; एल्गार परिवर्तन मेळाव्यानिमित्त गावकर्यांकडून जोरदार स्वागत
चिखली (महेंद्र हिवाळे) – अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीची तातडीने भरपाई द्या. शेतकर्यांसाठी जेलमध्येच काय, फासावरदेखील जाण्यास तयार आहे, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला ठणकावून सांगितले. तर शेतकर्यांसाठी जीवावर उदार होऊन लढणारे नेतृत्व म्हणजे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आहेत. शेतकर्यांना खरेच काही त्यांच्या पदरात पाडून घ्यायचे असेल तर त्यांना आशीर्वाद द्या, असे भावनिक आवाहन ज्येष्ठ पत्रकार तथा संवेदनशील विचारवंत राजेंद्र काळे यांनी त्यांचे जन्मगाव असलेल्या शेलसुरातील जाहीरसभेतून जिल्हावासीयांना केले.
एल्गार परिवर्तन मेळाव्यानिमित्त चिखली तालुक्यातील शेलसूर येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. गावातील तरुणांनी एकत्र येऊन तुपकर यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी केली तर गावातून मिरवणूक काढून तुपकरांचे जंगी स्वागत झाले. या मेळाव्याला परिसरातील शेतकर्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना मदत द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकरांनी यावेळी केली. तुपकर म्हणाले, की आपण गेल्या २२ वर्षांपासून शेतकर्यांसाठी लढत आहोत. माझा हा लढा वैयक्तिक नसून, सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि तरुणांसाठीचा लढा आहे, किती संकट आले तरी आपण हा लढा सोडला नाही. आणि यापुढेदेखील कितीही गुन्हे दाखल झाले कितीही वेळा जेलमध्ये जाण्याची वेळ आली, तरी आपण मागे हटणार नाही, असा निर्धारदेखील यावेळी रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला. गावागावातील तरुणांना तुपकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहेत. त्याचा प्रत्यय शेलसूरमध्येही बघायला मिळाला.याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तथा संवेदनशील विचारवंत राजेंद्र काळे यांचे भावविभोर भाषण झाले. त्यांनी रविकांत तुपकर यांच्या संघर्षाचा पट उलगडून दाखवला. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातून पाणी तरळले. शेतकर्यांसाठी लढणार्या नेत्यांपैकी विदर्भातील प्रकाशभाऊ पोहरे यांच्यानंतर, आणि प्रकाशभाऊंच्या आदर्शावर वाटचाल करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे एकमेव नेते आहेत. रवीभाऊंनी जीवावर उदार होऊन शेतकरी चळवळ जीवंत ठेवली आहे. जिल्ह्यात सर्व पर्याय वापरून झाले आहेत, कुणीही शेतकर्यांच्या अंधारलेल्या घरात आशेचा दिवा पेटवलेला नाही. आता एकदा रविकांत तुपकरांना आशीर्वाद द्या, से आवाहन राजेंद्र काळे यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी अॅड. शर्वरीताई तुपकर, नंदू पालवे, भगवानराव मोरे, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भारत वाघमारे, परमेश्वर झगरे, दत्तात्रय जेऊघाले, राहुल शेलार, गजानन देशमुख, अरुण पन्हाळकर, अरुण नेमाने, नवलसिंग मोरे, रवीअण्णा काळे, बंडूसाहेब जेऊघाले, भारत गव्हाणे, अनिल टेकाळे, अतुल तायडे, चेतन कणखर, शेनफडराव धंदर, दिलीप वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, मधुकर वाघमारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते व समस्त शेलसूरवासीयांनी या मेळाव्याचे जोरदार नियोजन केले होते.
————