– राज्य सहकार विभागाचा निर्णय, पूरस्थिती व पावसामुळे घेतला निर्णय
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – राज्यातील संततधार पाऊस, पूरस्थिती पाहाता, निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे सहकार विभागाने सुमारे ८ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. त्यानंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकाही ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असून, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, राज्यातील बहुतांश भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. भारतीय हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या १३ जुलै २०२२ रोजीच्या अहवालानुसार, राज्यातील पूरस्थितीमुळे १ ते १२ जुलै या कालावधीत ८९ व्यक्ती आणि १८१ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेली २४९ गावे, तर एकंदरीत १३६८ घरांची पडझड झालेली आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील सर्व धरणे पूर्णपणे भरली असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्था आणि जनजीवनावर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
सदर परस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता, जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कक मधील तरतूदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, २५ किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच, ज्याप्रकरणी सर्वोच्च/ उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत, असे सहकार विभागाने आपल्या आदेशात नमूद केलेले आहे.
———————