हिवरा आश्रम, ता. मेहकर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – राज्यातील संवेदनशील कवी, साहित्यिक आणि आदर्श शिक्षक असलेले संजय भारती यांची विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विवेकानंद आश्रमाच्या व्यवस्थापन मंडळाने एकमताने हा निर्णय घेतला आहे. श्री भारती हे विद्यार्थीप्रिय शिक्षक असून, मितभाषी व संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत. मनुष्य, सृष्टी, समष्टी, भावना आणि संवेदना या त्यांच्या साहित्याच्या केंद्रबिंदू राहिलेल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीने राज्यात ख्यातकीर्त ठरलेल्या विवेकानंद विद्या मंदिराचे पर्यवेक्षण अधिक दर्जेदार, सकारात्मक आणि गुणवत्तापूर्ण बनेल, असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे.
राज्यातील विविध साहित्य संमेलने संजय भारती यांच्या कवितेंनी गाजवलेली आहेत. व्यक्ती म्हणूनही ते तितकेच निर्मळ, गोड आणि कमालीचे शिस्तप्रिय आहेत. मराठी भाषेचे अध्यापन करताना त्यांनी या भाषेची सौंदर्यवृद्धी करणार्या असंख्य काव्यरचना केल्या आहेत. मनुष्य, निसर्ग, मन आणि भावना यांचे सुंदर चित्रण या काव्यांतून व्यक्त होत असते. श्री भारती हे विवेकानंद आश्रमाचे विश्वस्तही राहिलेले आहेत. निष्काम कर्मयोगी पू. शुकदास माऊलींवरील अढळ श्रद्धा, विवेकानंद आश्रमाप्रती कमालीची बांधिलकी आणि रामकृष्ण परमहंस यांच्या सेवेचा वसा त्यांच्या कार्यातून सातत्याने प्रतिबिंबीत होत असतो. श्री भारती यांच्या नियुक्तीचा निर्णय विवेकानंद आश्रम व्यवस्थापन मंडळाने एकमताने घेतला, त्यानंतर विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर. डी. पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
विवेकानंद आश्रमाचे विद्यमान अध्यक्ष, निस्सिम सेवाव्रती पू. आर. बी. मालपाणी सरांचे विद्यार्थी राहिलेले संजय भारती हे आता त्याच विद्यालयावर पर्यवेक्षक झालेले आहेत. विवेकानंद ज्ञान संकुलातील जवळपास सर्वच शैक्षणिक संस्थांवर पू. मालपाणी यांचे विद्यार्थी अधिकार व सेवाकार्य सांभाळत आहेत. विवेकानंद आश्रमाचे व्यवस्थापनही पू. मालपाणी सरांच्या विद्यार्थ्यांच्या हाती आलेले आहे. त्याग, सेवा, गुणवत्ता आणि अजोड कार्यक्षमता या गुणांच्या सर्वोच्च योगदानासाठी पू. मालपाणी सर यांचे विद्यार्थी राज्यभरात ओळखले जातात. श्री संजय भारती हे त्यापैकीच एक आहेत.
—————-
संवेदनशील कवी, साहित्यिक, आदर्श शिक्षक संजय भारती यांची विवेकानंद विद्या मंदिराच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती