– राजकारण ‘मातोश्री’ ते ‘कृष्णकुंज’कडे सरकणार?
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘कृष्णकुंज’वर जात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील उघड झाला नसला तरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मनसे सहभागी होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. राज्याचे राजकारण पुन्हा एकदा ‘मातोश्री’ ते ‘कृष्णकुंज’कडे सरकविण्यासाठी फडणवीस हे राजकीय खेळी करत असावेत, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
नवीन सरकारबाबत मनसेची भूमिका अद्याप स्पष्ट नसली तरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन नेत्यांत बराचवेळ चर्चा झाली. ही चर्चा मात्र बाहेर आली नाही. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबतही चर्चा होत आहे. परंतु, ही चर्चा अफवा असल्याचे राज ठाकरे यांनीच स्पष्ट केले होते. त्यानंतर आता फडणवीस यांनी राज यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भाजप-मनसे युतीच्या दिशेने पाऊल!
दरम्यान, भाजप-मनसे व शिंदे गटाची शिवसेना अशी एकत्रित युती करण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज ठाकरे यांना प्रस्ताव दिला असावा, व आगामी मुंबई महापालिकासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही युती असावी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे विश्वासनीय सूत्राने सांगितले आहे. मुंबई महापालिकेत ही युती झाली तर महापालिकेतील शिवसेनेची सत्ता संपुष्टात आणणे शक्य आहे, असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला असावा, असेही सांगण्यात आले आहे.