– आमच्याकडे ५० पेक्षा अधिक आमदार – एकनाथ शिंदे
– काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा जाहीर
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेलेल्या आमदारांपैकी १२ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची शिफारस शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली असतानाच, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीदेखील ३७ शिवसेना आमदारांचे त्यांना समर्थन असल्याचे पत्र उपाध्यक्ष तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना, संबंधित आमदारांच्या सहीनिशी पाठवले आहे. त्यामुळे आता उपाध्यक्ष काय निर्णय घेतात? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसे झाले तर शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचा दुसरा गट म्हणून मान्यता मिळेल. दरम्यान, शरद पवार व काँग्रेस नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही सरकारच्या पाठीशी ठाम आहोत, भाजपचे सरकार पाडण्याचे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही, असे काँग्रेस नेते तथा महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खारगे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या या राजकीय नाट्याचा शेवट अखेर विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यातूनच होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत चालले आहे. काल, शिवसेनेने एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांच्यासह १२ आमदारांचे पक्षादेश उल्लंघनप्रकरणी निलंबन करण्याची व आमदारकी रद्द करण्याची शिफारस विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केल्यानंतर, आज सकाळीच बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ३७ शिवसेना आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे पत्र उपाध्यक्षांना पाठवले. त्यामुळे शिवसेना आपल्यासोबत असून, ठाकरे यांनी नियुक्त केलेला विधिमंडळ गटनेता व पक्षप्रतोद अवैध असल्याचे नमूद केले आहे.
शिंदे यांच्या या पत्रावर उपाध्यक्ष काय निर्णय घेतात? तसेच शिवसेनेच्या पत्रानुसार कारवाई करतात की नाही? याकडे आता राज्याचे लक्ष लागलेले आहे. उपाध्यक्षांचा निर्णय विरोधात गेल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी एकनाथ शिंदे गटाने चालवली असून, तसे वकील तयार ठेवले आहेत.
भाजप म्हणते, आमचा काही संबंध नाही!
गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबलेल्या व उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणार्या बंडखोर शिवसेना आमदारांशी आमचा काहीच संबंध नाही, असे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट करत, हात झटकून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. परंतु, हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांसह भाजपचे तेथील नेते दिसत असणारे, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे स्वतः या आमदारांसोबत दिसत असलेले अनेक व्हिडिओ पुढे आले असतानाही, भाजपचे हात झटकणे नेमकी काय राजकीय खेळी आहे? अशी चर्चा मुंबईत होत होती. या बंडखोर आमदारांसाठी दररोज ५० लाखांचा खर्च येत असून, हा खर्च कोण करत आहे, असाही प्रश्न निर्माण झालेला आहे.