– शेतकर्यांना लुटून पळालेले आरोपी, पोलिसांना सापडेना
चिखली (तालुका प्रतिनिधी) – ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकर्यांची आर्थिक फसवणूक करून पळून गेलेल्या संतोष बाबूराव रनमोडे याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात चिखली पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले असून, या फसवणुकीचा तपास बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. चिखली पोलिस ठाण्यात आतापर्यंत १६१ व अंढेरा पोलिस ठाण्यात १२० शेतकर्यांनी रनमोडेसह त्याच्या साथीदारांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. चिखली पोलिस ठाण्यांत दाखल तक्रारीनुसार, फसवणुकीचा आकडा तीन कोटी ४१ लाख ४२ हजार ५०५ रुपयांपर्यंत जात आहे. शेतकर्यांकडून सोयाबीन, हरभरा या शेतमालाची खरेदी करून, त्यांना त्यापोटी चेक देऊन हा भामटा पळून गेलेला आहे. हा तपास आर्थिक गुन्हा शाखा करत असली तरी, तो थंडावला असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. कारण, अद्याप आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काहीही हालचाल केलेली दिसत नाही. पळालेले आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांच्या या ढिसाळ तपासाबाबत शेतकरीवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चिखली तालुक्यातील जवळपास पाचशे ते साडेपाचशे शेतकर्यांचा शेतमाल खेडा पद्धतीद्वारे खरेदी करून बनावट व्यापारी असलेला संतोष रनमोडे व त्याचे साथीदार शेतमालासह पळून गेले आहेत. या घटनेत १० कोटींपेक्षा जास्त रकमेची शेतकर्यांची फसवणूक झाली आहे. परंतु, फक्त चिखली पोलिसांत दाखल तक्रारींचा आकडा साडेतीन कोटींचा आहे. तब्बल २७१ शेतकर्यांनी तक्रारी दाखल करून व त्यावर गुन्हे दाखल होऊनही पोलिसांचा तपास मात्र शून्य आहे. अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेले नाही.
बुलडाणा जिल्ह्याला हादरविणार्या या शेतकरी फसवणूक प्रकरणात सुरुवातीला चिखली व अंढेरा पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ चालवली होती. परंतु, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीडित शेतकर्यांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. त्यावेळी स्वतः जिल्हाधिकारी हे जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोलले होते. त्यानंतर गुन्हे दाखल करून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्याची कारवाई झाली. परंतु, तपास काहीच होत नसल्याने व त्याबाबत पोलिसांकडून माहितीही मिळत नसल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहे. पोलिस आरोपींना पाठिशी घालण्याचे काम करत आहे का, हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. मध्यंतरी गांगलगावच्या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते, अशी माहिती मिळत आहे. परंतु, त्यांचे पुढे काय झाले हेदेखील कळू शकले नाही.
या गावातील शेतकर्यांची झाली आर्थिक फसवणूक
या शेतमाल खरेदीतील फसवणुकीमुळे चिखली तालुका हादरून गेला आहे. तालुक्यातील खैरव, अंबाशी, गांगलगाव, भालगाव, घोडप, कोलारा, मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, अंचरवाडी, मेरा, अमोना, पिंपळवाडी आदी गावांतील शेतकर्यांचा विश्वास संपादन करून संतोष बाबुराव रनमोडे व त्याचे साथीदार अशोक म्हस्के, नीलेश साबळे यांनी हरभरा, सोयाबीन आदी शेतमाल जादा दराचे आमिष दाखवून खरेदी केला होता. परंतु, पैसे न देता खोटे चेक देऊन हे भामटे पळून गेले आहेत. जवळपास पाचशे ते सहाशे शेतकर्यांची अंदाजे १० कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झालेली आहे. या भामट्या रनमोडेचे पंटर तालुक्यात अद्यापही कार्यरत असून, ते शेतकर्यांना नानाविध आमिष दाखवून पोलिसांत जाऊ नका, असे सांगत आहेत. संपूर्ण चिखलीसह मेहकर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा या तालुक्यांतही या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती आहे. सर्व शेतकरी गरीब असून, त्यांच्या कष्टाचा पैसा परत मिळवून देणे ही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांची जबाबदारी आहे. रनमोडे व त्याच्या साथीदारांची मालमत्ता जप्त करून या शेतकर्यांचे पैसे त्यांना देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
हा आर्थिक गुन्हा असल्याने त्याचा तपास बुलडाणा येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु, आता दोन आठवडे उलटून गेले तरी तपासात काहीच प्रगती नाही. आरोपी रनमोडे हा पळून गेलेला असून, त्याला अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. लोकप्रतिनिधी मुंबईतील राजकीय घडामोडींत व्यस्त आहेत. पोलिस तपास करत नाहीत? अशा परिस्थितीत पीडित शेतकर्यांनी जायाचे कुणाकडे? पोलिसांनी आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल.
– बाळू पाटील, सरपंच, मिसाळवाडी (ता. चिखली)
—————–