-खिशात सापडल्या चार चिठ्ठ्या; पत्नीसह कथित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी कुटुंबीयांचे सांत्वन
अंढेरा (प्रतिनिधी) : पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराकडून होत असल्याचा आरोप असलेल्या मानसिक छळाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंढेरा येथे घडली. आत्महत्येनंतर मृताच्या खिशात चार चिठ्ठ्या आढळून आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मृताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अंढेरा पोलीस ठाण्यात पत्नी व तिच्या कथित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सुरज रामभाऊ तेजनकर असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची आई शशिकला रामभाऊ तेजनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पत्नी वंदना सुरज तेजनकर (सध्या रा. मोहाडी, ता. सिंदखेडराजा) आणि तिचा कथित प्रियकर सतीश रामेश्वर काकडे (रा. बोरगाव काकडे, ता. चिखली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज आणि वंदना यांचा २०२१ मध्ये विवाह झाला होता. त्यांना नऊ महिन्यांची मुलगी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून वंदना माहेरी राहत होती. याच काळात तिचे सतीश काकडे याच्यासोबत कथित प्रेमसंबंध जुळल्याचा आरोप सुरजच्या कुटुंबीयांनी केला आहे. या कारणावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. या वादाला कंटाळून सुरजने पत्नीकडे कायदेशीर घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र, पत्नीने घटस्फोटास नकार देत त्याच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सुरज सुमारे सहा महिन्यांपासून चिखली येथील एका महाविद्यालयात कार्यरत होता. १५ जुलै रोजी रात्री सुमारे ८ वाजता कामावरून परतत असताना महिंद्रा कोटक बँकेसमोर त्याला पत्नी वंदना एका व्यक्तीसोबत दुचाकीवर जाताना दिसल्याचा आरोप आहे. या घटनेवरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. त्यानंतर पत्नीने सुरजविरुद्ध गुन्हा दाखल केला. आधीच घटस्फोटास नकार आणि त्यानंतर झालेल्या या प्रकरणामुळे सुरज मानसिक तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. या मानसिक तणावातूनच सुरजने २३ जुलै रोजी पहाटे सुमारे ५ वाजता अंढेरा येथील आपल्या चुलत्याच्या शेतातील बेलाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पंचनाम्यादरम्यान सुरजच्या खिशात चार चिठ्ठ्या आढळून आल्या. त्या चिठ्ठ्यांतील मजकूर तसेच मृताच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे आणि अंढेरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रुपेश शक्करगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश देठे यांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश घुगे करीत आहेत. या घटनेमुळे अंढेरा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बुलढाण्याचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी तेजनकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, परवा शोकाकुल वातावरणात सुरज तेजनकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आज त्यांच्या रक्षाविसर्जनाचा विधीही धार्मिक वातावरणात पार पडला.