-ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका; ॲड. गणेश थुट्टे गंभीर जखमी, नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी
राजेंद्र घुबे (देऊळगाव घुबे) : देऊळगाव धनगर ते मेरा चौकी या शासकीय रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरून दररोज सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून अनेकांना गंभीर दुखापतींसह जीवही गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
याच रस्त्यावर ३ जानेवारी २०२६ रोजी भरोसा येथील ॲड. गणेश पी. थुट्टे हे चिखली न्यायालयात कामानिमित्त दुचाकीने जात असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सावकाश वाहन चालवत होते. मात्र भरोसा–मेरा चौकी मार्गावरील महादेव मंदिरामागे शे. अहमद यांच्या शेतालगत असलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी घसरल्याने ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तत्काळ चिखली येथील डॉ. चिंचोले रुग्णालयात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सारंग व्यवहारे यांच्याकडे हलविण्यात आले. तेथे त्यांच्या डाव्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या अपघातामुळे त्यांना शारीरिक तसेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. उपचाराच्या काळात त्यांना न्यायालयीन कामकाजही करता आले नाही, त्यामुळे आर्थिक फटकाही बसला.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्त्याचे काम घाईघाईने आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून करण्यात आले आहे. तसेच संबंधित विभागाने कामाची योग्य तपासणी न करताच कंत्राटदाराला देयके अदा केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. देऊळगाव धनगर ते मेरा चौकी (ता. चिखली, जि. बुलढाणा) हा सुमारे ९ किलोमीटरचा रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय झाला असून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर अवजड वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने योग्य दर्जाच्या साहित्याचा वापर करून रस्त्याची दुरुस्ती करावी, दोषी कंत्राटदाराची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी दर्जेदार रस्ता तयार करावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.