-क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुण्यातील बैठकीत राज्यभर संघटनात्मक बांधणीचा निर्धार; महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी चैत्राली शेलार यांची नियुक्ती
पुणे/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : फसव्या सरकारने अटी-शर्तींचा घोळ घालून केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून, जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला कर्जमुक्तीचा लढा आणखी बळकट करून राज्यव्यापी केला जाईल, असा एकमुखी निर्धार क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.
पुण्यातील कोथरूड येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जमुक्तीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बैठकीत आगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्यातील विविध पदांवरील नव्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी चैत्राली शेलार (धस, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांची, तर मराठवाडा विभागीय महिला अध्यक्षपदी पूजा चव्हाण (हिमायतनगर, जि. नांदेड) यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे म्हणाले, “रविकांत तुपकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला कर्जमुक्तीचा लढा आता कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. राज्यभरातील शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडे आशेने पाहत असून, तुपकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरतील.” माँसाहेब जिजाऊंची जन्मभूमी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातून सुरू झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा विस्तार आता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात झाला असून, पुढील काही दिवसांत राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर संघटनात्मक बांधणीचे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहितीही राजकुमार कसबे यांनी दिली. या बैठकीला राज्य समन्वयक सचिन पांडुळे, राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे, राज्य उपाध्यक्ष जयवंत दहिभाते, बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, राज्य कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब मुंढे, धाराशिव जिल्हाध्यक्ष भास्कर वारे, सांगली जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, युवा नेते श्रीराम चलवाड, सांगली युवा जिल्हाध्यक्ष मयूर गायकवाड, सुनील दाशाळ, मल्हारी कांबळे, युवा नेते अजित गडदे, कांतीलाल शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते शिवराम गायकवाड, अमोल घुमरे, लातूरचे दत्ता किन्हीकर, सावन गवळी, लातूर युवा जिल्हाध्यक्ष प्रज्योत हुडे, विशाल ढोबळे, बिभीषण शिंदे, प्रभाकर मजगे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या नियुक्त्या
- चैत्राली शेलार (धस, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) – महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष
- पूजा चव्हाण (हिमायतनगर, जि. नांदेड) – मराठवाडा विभागीय महिला अध्यक्ष
- राजेंद्र ढमाले – जिल्हाध्यक्ष, पुणे शहर
- ॲड. अनिल भिलारे – जिल्हाध्यक्ष, पुणे विधी आघाडी
- अमोल बोराडे – जिल्हा उपाध्यक्ष, पुणे शहर
- ज्योतिराम पावले – भूम तालुका संघटक
- विशाल लोमटे – सातारा शहर जिल्हाध्यक्ष
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.