– चिखली तालुक्यात सोयाबीनचीच सरशी; ‘एल निनो’च्या संकटानंतर सलग तीन दिवस धो-धो पाऊस
– कृषी विभागाकडून पुरेशी ओल पाहूनच पेरणी करण्याचे आवाहन; धूळपेरणीला जीवदान
– ‘मृग-रोहिणी’ चुकले तरी दमदार पावसाने आशा पल्लवित; मका, कपाशी आणि तुरीलाही स्थान
चिखली (अंकुश पाटील) : प्रदीर्घ दडी मारल्यानंतर जूनच्या मध्यानंतर वरुणराजाने जोरदार पुनरागमन केले आहे. यामुळे जिल्ह्यातील रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग आला असून, आतापर्यंत ७ लाख ३७ हजार ७९ हेक्टर क्षेत्रापैकी ४ लाख ३३ हजार ७९२ हेक्टरवर (सुमारे ७० टक्के) पेरण्या पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. यात शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सर्वाधिक पसंती दिली आहे. सततच्या पावसामुळे उर्वरित ३० टक्के पेरण्या मात्र सध्या रखडल्या आहेत.
यावर्षी ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन लांबले. दरवर्षी मृग किंवा रोहिणी नक्षत्रात पेरणी झाल्यास बियाण्याची उगवण क्षमता वाढते, रोप सशक्त होऊन उत्पादन चांगले मिळते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अखेर २४, २५ आणि २६ जून रोजी जिल्ह्यात सलग तीन दिवस धो-धो पाऊस कोसळल्याने रखडलेली कामे मार्गी लागली.
जिल्ह्यातील अनेक शेतकरी दरवर्षी धूळपेरणी करतात. यंदाही सुमारे २० हजार हेक्टरवर धूळपेरणी झाली होती. सुरुवातीला विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या आधारे स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचन करून पिके जगवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पाण्याचे स्रोत आटल्याने आणि पाऊस लांबल्याने पिके संकटात आली होती. अशा वेळी झालेल्या दमदार पावसामुळे या धूळपेरणीला मोठा दिलासा मिळाला असून पिके बहरली आहेत.
अशी झाली पिकांची पेरणी (हेक्टरमध्ये):
- सोयाबीन : २,६०,६१५
- कपाशी : ८७,११०
- तूर : ६०,१४३
- मका : १९,८७७
- उडीद : २,५४०
- मूग : २,४२५
“एल निनोमुळे मान्सून उशिराने आला. पण उशिरा का होईना, पावसाचे दमदार आगमन झाल्यामुळे खरीप पेरण्या आटोपल्याचे समाधान आहे. पुढेही असाच पाऊस बरसत राहो हीच अपेक्षा.” – अरुण शिंदे, शेतकरी
“यंदा पेरणीला जवळपास वीस दिवसांचा विलंब झाला आहे. परंतु पाऊस चांगला असल्याने पेरण्या व्यवस्थित आटोपल्या आहेत. पुढे हवामान अनुकूल राहिल्यास उत्पादनात घट येणार नाही.” – विष्णू थुटटे, शेतकरी
कृषी विभागाचा सल्ला:
“शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलावा तपासूनच पेरणी करावी. ज्या भागात जास्त पाऊस झाला आहे, तिथे पेरणीची घाई करू नये. पेरणी करताना आंतरपिकांचा समावेश करावा. ट्रॅक्टरने पेरणी करताना ती दिवसाच करावी आणि जास्त खोलवर पेरणी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.” – संतोष डाबरे, जिल्हा कृषी अधीक्षक, बुलढाणा