-संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचा उपक्रम
आळंदी (अर्जुन मेदनकर) : पुणे-आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत भव्य दिव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प. आचार्य भगवानजी महाराज शास्त्री, आळंदी हे करणार आहेत. पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मास सुरू झाल्याने नामस्मरण, चिंतन, श्रवण, भजन आणि कीर्तनासाठी ही मोठी पर्वणी मानली जाते. भाविक व नागरिकांनी या धार्मिक सप्ताहात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी केले आहे. शनिवार, २३ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत श्री ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच शनिवार, ३० मे ते ६ जून २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या धार्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी केले आहे.