-शिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी व्यसनमुक्ती, संस्कार आणि मोबाईलच्या अतिवापरावर प्रबोधन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : “जीवनात व्यसनाधीनता वाढत चालली आहे. आपली मुले वाममार्गाला जात असतील तर त्यांना लहानपणापासूनच आवर घाला. कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नका, तो विनाशाचा मार्ग आहे,” असे प्रबोधन प्रेममूर्ती जगदिशानंद शास्त्री, आळंदी यांनी शिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी केले.
तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठात सात दिवसीय शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य दिव्य सभामंडपात हजारो भाविकांना कथा श्रवणाचा लाभ घेता यावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शिवपुराण कथेचे निरूपण करताना शास्त्री म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची आवड आणि वृत्ती चांगली असली पाहिजे. माणसाची वृत्ती सकारात्मक असेल तर कोणत्याही कामात यश प्राप्त होते. कलियुगात दानधर्म करणे आवश्यक असून अभिमान बाळगू नये, कारण तो कधी गळून पडेल हे सांगता येत नाही. धार्मिक कार्य करताना काही नियमांचे पालन करण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी बेल तोडू नये, रविवारी तोडून ठेवावी तसेच एकादशीच्या दिवशी काही गोष्टी टाळाव्यात, याबाबत त्यांनी कथेमधून दाखले देत सविस्तर विवेचन केले. मुलांना लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावण्याची गरज असल्याचे सांगताना ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. दहावीपर्यंत अभ्यासाची सवय लागली तर बारावीपर्यंत विद्यार्थी उत्तम यश मिळवू शकतो. त्यासाठी पालकांनी स्वतः आदर्श ठेवणे गरजेचे आहे.” देवराज ब्राह्मणाची कथा सांगताना त्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला. “मुलं व्यसनाच्या आहारी गेली तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त झाले पाहिजे. यासाठी संत, साधू आणि वारकरी समाज सातत्याने उपदेश करत असतात,” असे ते म्हणाले.
आजच्या काळातील मोबाईल व्यसनावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “आज प्रत्येक महिला व पुरुषाजवळ मोबाईल फोन आहे. सतत मोबाईलकडे लक्ष असल्याने समोरचा माणूस काय बोलतो याकडे दुर्लक्ष होत आहे. मोबाईलचा वापर करा, पण त्याच्या आहारी जाऊ नका. लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा.” शिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी श्रोत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. संगीतमय शिवपुराण कथा ऐकताना भाविक मंत्रमुग्ध झाले होते. महिला भाविकांनी पावली आणि फुगडी खेळत भक्तीरसात सहभाग नोंदविला. सात दिवस चालणाऱ्या या शिवपुराण कथेच्या श्रवणासाठी दूरदूरवरून भाविक आले असून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. नियोजनाची जबाबदारी मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, विश्वनाथ अप्पा जितकर, गुंड्डाप्पा स्वामी तसेच संस्थानचे भक्त सांभाळत आहेत.