-ढोकवड येथे भव्य नागरी सत्कार; मान्यवरांकडून गौरव
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : शिरूर कासार तालुक्यातील ढोकवड गावचे सुपुत्र फौजी श्री लक्ष्मण नानाभाऊ मिसाळ यांनी भारतीय सैन्य दलात हवलदार (सीएचएम) पदावर सलग २४ वर्षे प्रामाणिक व निष्कलंक सेवा पूर्ण करून मायभूमीत पुनरागमन केले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त ढोकवड येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
देशाच्या सीमांवर प्रतिकूल परिस्थितीत राहून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या फौजी मिसाळ यांच्या कार्याचा यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरव केला. या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख सोपान काका मोरे तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ भाऊ खेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते फौजी मिसाळ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मान्यवरांनी “देशसेवा हीच सर्वोच्च सेवा असून सैनिकांमुळेच देश सुरक्षित आहे,” असे मत व्यक्त केले. फौजी मिसाळ यांनी २४ वर्षे कुटुंबापासून दूर राहून राष्ट्रसेवेचे कर्तव्य बजावले असून, त्यांचा जीवनप्रवास युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमास ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोकवड ग्रामस्थांनी जल्लोषात आपल्या वीर सुपुत्राचे स्वागत करत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. देशसेवेचे कर्तव्य यशस्वीपणे पार पाडून घरी परतलेल्या फौजी श्री लक्ष्मण नानाभाऊ मिसाळ यांना पुढील आयुष्यासाठी सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.