-“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी” – सुरेश भट
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव तसेच रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी) येथे जागतिक मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून गुरुदेव अध्यात्मिक शक्तीपीठ, आळंदीचे संस्थापक-अध्यक्ष ह.भ.प. ज्योतिषाचार्य पांडुरंग महाराज शितोळे (शास्त्री) उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ होते. मराठी विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. संजीव कांबळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्दिष्ट स्पष्ट करत मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगितले. मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
पांडुरंग महाराज शितोळे यांनी आपल्या मार्गदर्शनात संस्कृतपासून आजपर्यंत मराठी भाषेची झालेली स्थित्यंतरे विशद केली. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेला दिलेला आधार, संत साहित्याचे योगदान, तसेच मराठी भाषेचा जागतिक स्तरावर झालेला गौरव यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या ओळी उद्धृत करत मराठी भाषेचे श्रेष्ठत्व अधोरेखित केले. “आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने” या ओळींचा संदर्भ देत शब्दसंपत्ती हीच खरी संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेचे स्थान महत्त्वाचे असून मराठीच्या सुमारे ५२ बोलीभाषा तिचे वैभव असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे खजिनदार मयूर ढमाले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास प्रा. रोहित कांबळे, प्रा. संतोष कदम, प्रा. प्रफुल्ल जाधव, प्रा. सविता मानके, प्रा. दिपाली ताम्हाणे, प्रा. रंजीत कदम, प्रा. माणिक कसाब, प्रा. दीपक देवकर, प्रा. प्रभाकर गायकवाड, प्रा. सीमा साळुंखे, प्रा. रूपाली औटी, प्रा. सुरेंद्र पवार, प्रा. मीरा केसकर, प्रा. रेखा सुतार, प्रा. मीना शिंदे, प्रा. प्रतीक्षा शिंगाडे, प्रा. चित्रा पाटील, प्रवीण भावे, सचिन गावडे, देवानंद गोरडवार आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भताशे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ताम्हाणे यांनी मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.