-लोणार येथील क्षेत्रदुरुस्ती प्रकरण रखडल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे धाव
लोणार (वाजिद खान ) : “माझ्या जीवंतपणी न्याय द्या हो!” असा आर्त टाहो फोडत लोणार येथील कर्करोगग्रस्त कांतिलाल सुवालाल जोगड यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे न्यायाची मागणी केली आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जमीन क्षेत्रदुरुस्ती प्रकरणामुळे ते त्रस्त झाले आहेत.
अर्जानुसार, लोणार येथील नगर भुमापन क्रमांक ३३४ व ३३५ यांच्या नझुल सर्व्हेदरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांकडून चूक झाली. ३३४ मधील काही क्षेत्र ३३५ मध्ये दाखविण्यात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर कांतिलाल सुवालाल जोगड व मंगलचंद आदिनाथ संगवई यांनी सर्व कागदोपत्री पुराव्यानिशी क्षेत्रदुरुस्तीचे अपील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १०६ अन्वये सन २०१५ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे दाखल केले. सदर अपील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख बुलडाणा यांच्या मार्फत उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय लोणार येथे सत्यता पडताळणीसाठी पाठविण्यात आले. उपअधीक्षक कार्यालयाने दोन्ही अर्जदारांना शासकीय मोजणी करण्याच्या सूचना देऊन आवश्यक शुल्क भरून घेतले. स्थळनिरीक्षण पंचनामा व कायदेशीर जबाब नोंदवून प्रकरण अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले.
मात्र अर्जदारांनी अनेक वेळा दोन्ही कार्यालयांत पाठपुरावा करूनही प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले गेले नसल्याचे समजले. दरम्यान संबंधित कर्मचारी बदली झाल्याने नोंदींचे हस्तांतरण झाले नसल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे अर्जदारांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. अर्जदारांनी नमूद केले की, यापूर्वी त्यांच्या नातेवाईक कांतिलाल मुथा यांचेही तत्सम अपील सन २०१० मध्ये दाखल झाले होते; मात्र त्यांना जिवंतपणी न्याय मिळाला नाही. २३ एप्रिल २०२१ रोजी त्यांचे निधन झाले, तरीही त्यांच्या वारसांना अद्याप न्याय मिळालेला नाही.
या पार्श्वभूमीवर कर्करोगाने ग्रस्त कांतिलाल जोगड यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह महसूल व भूमि अभिलेख विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना स्पीड पोस्टद्वारे निवेदन पाठवून तातडीने न्याय देण्याची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणी अर्जदारासह सर्व अपीलकर्त्यांना नेमका कधी न्याय मिळणार आणि शासनस्तरावर कोणती कार्यवाही होणार, याकडे लोणारकरांचे लक्ष लागले आहे.