-वारसा स्थळ वाचवण्यासाठी व्यापारी-नागरिकांचा १०० टक्के प्रतिसाद, शांततेत आंदोलन
लोणार (वाजिद खान): जागतिक वारसा म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून, सरोवराच्या काठावर असलेले अतिप्राचीन व भाविकांचे श्रद्धास्थान श्री कमळजा माता मंदिर पाण्याखाली जाण्याच्या स्थितीत आले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि मंदिराचे अस्तित्व वाचवण्यासाठी बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी ‘लोणार बंद’ पुकारण्यात आला. या बंदला लोणार शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून १०० टक्के बंद पाळण्यात आला.
लोणार शहरातील समस्त नागरिक, व्यापारी संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने हा बंद जाहीर करण्यात आला होता. याबाबतचे लेखी निवेदन लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले होते. कमळजा माता भक्त परिवार यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे मंदिराला तातडीचा धोका निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, मागील काही काळापासून लोणार सरोवराची पाणीपातळी वाढत असल्याने मंदिर परिसर जलमय होत आहे. त्यामुळे या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
मुख्य मागण्या काय?
आंदोलनकर्त्यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत —
-
वाढत्या पाणीपातळीमुळे होणारे मंदिराचे नुकसान तातडीने थांबवावे.
-
पुरातत्व विभागाने कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना राबवाव्यात.
-
भविष्यात अशा प्रकारे वारसा स्थळांचे नुकसान होऊ नये, यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा.
विशेष म्हणजे, या विषयासंदर्भात १९ जानेवारी २०२६ रोजी तहसीलदार (तालुका दंड अधिकारी) यांनाही लेखी स्वरूपात माहिती देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
शांततेच्या मार्गाने बंद
हा ‘लोणार बंद’ पूर्णपणे शांततेच्या मार्गाने पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा — जसे की दवाखाने व मेडिकल स्टोअर्स — या बंदमधून वगळण्यात आल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य करावे, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली होती. दरम्यान, लोणार शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली.