-साखरखेर्ड्यात बसस्थानक परिसरात शोकसभा, सर्वपक्षीय नेत्यांची एकत्रित उपस्थिती
साखरखेर्डा (अशोक इंगळे): राज्याचे तडफदार तथा कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त येथे धडकताच सर्वपक्षीयांच्या वतीने तीव्र हळहळ व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील कर्तबगार नेत्याला आज आपण पोरके झालो असून, ही राजकीय व सामाजिक पोकळी कधीही भरून येणार नाही, अशा शब्दांत अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
येथील बसस्थानक परिसरात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत सर्वप्रथम अजितदादांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शोकसभा घेऊन सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेस राष्ट्रवादी (अ.प.), राष्ट्रवादी (श.प.), भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे), वंचित बहुजन महासंघ आदी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
याप्रसंगी दिलेल्या शब्दांचे पक्के असणारे अजितदादा पवार यांच्या झंझावाती सामाजिक व राजकीय जीवनप्रवासावर माजी प्राचार्य डी. एन. पंचाळ यांनी प्रकाश टाकला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, शिवसेनेचे माजी सरपंच महेंद्र पाटील, भाजपचे राज्य प्रतिनिधी रावसाहेब देशपांडे, माजी समाजकल्याण सभापती बाबुराव मोरे, उपसरपंच संग्राम राजपूत, माजी सरपंच कमलाकर गवई, रामदाससिंग राजपूत, आशिष पोंधे, चंद्रशेखर शुक्ल, ललित अग्रवाल, माजी उपसरपंच अय्यूब शेठ कुरेशी, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष मंडळकर, युवासेनेचे संदीप मगर, दादाराव गवई, सुनील रिंढे, दर्शन गवई, दिलीप इंगळे, सुनील जगताप, बबन अग्रवाल, नंदू कोतवाल, आदित्य तिवारी, गोपालसिंग राजपूत, सिताराम काळे, शुभम राजपूत, जमना प्रसाद तिवारी, नारायण अग्रवाल, संदीप खिल्लारे, देवानंद खंडागळे, राजू लोढे, अशोक इंगळे, संतोष गाडेकर, आसाराम कामे आदींची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त येथील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.