-महिला सक्षमीकरणासाठी ‘सुधारक सन्मान पुरस्कार’ सोहळा; महिलांना साथ देणाऱ्या पुरुषांचा गौरव
साखरखेर्डा (अशोक इंगळे): महिला घरातील कामे सांभाळत असतानाच नोकरी, उद्योग व व्यवसायाच्या माध्यमातून बाहेरही कार्यरत असतात. हा दुहेरी संगम साधताना त्या कधीच डगमगत नाहीत. बचत गटांच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय उभारून अनेक महिलांनी आपली आर्थिक परिस्थिती भक्कम केली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून अधिक सक्षम बनतील, असा विश्वास निवासी नायब तहसीलदार कु. प्रांजल पवार यांनी व्यक्त केला.
दिनांक २७ जानेवारी रोजी साखरखेर्डा येथील आशीर्वाद लॉन येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा बुलढाणा व नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत लोकसंचलित साधन केंद्र, साखरखेर्डा यांच्या वतीने महिला सक्षमीकरण अंतर्गत ‘सुधारक सन्मान पुरस्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. महिलांना सहकार्य करून त्यांना सक्षम बनवणाऱ्या पुरुषांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सिंदखेडराजा येथील नायब तहसीलदार कु. प्रांजल पवार मॅडम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर, लोणार पंचायत समितीच्या माजी सभापती तथा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई इंगळे, साखरखेर्डा सरपंच सौ. ज्योती जाधव, गीताताई संदीप मगर, सौ. रेखा रामभाऊ जाधव, बचत गटाच्या अध्यक्ष कमलबाई जाधव, शिंदी येथील पोलीस पाटील वैशालीताई हाडे, साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे, माजी सरपंच कमलाकर गवई, सुमेध गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक आशा शरद सरकटे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते २५ जणांना ‘सुधारक सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये गणेश गवई, प्रदीप खरात, नितीन कंकाळ, सोहम गवई, विनोद सौभागे, भीमराव काळे, विशाल गवई, विशाल मंडळकर, शिवाजी खरात, सत्यनारायण काळुसे, प्रदीप जाधव, सुनील तांगडे, गजानन सांगळे, प्रल्हाद गवई, विजय भालेकर, राजेंद्र देशमुख, शिवाजी ठोसरे, अमोल गवई, जयसिंग चव्हाण, संजय जाधव, प्रशांत साळवे आदींचा समावेश होता.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भाग्यश्री खेडेकर म्हणाल्या की, आज महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक व सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिलांच्या कार्याला पुरुषांचे सहकार्य महत्त्वाचे असून, महिला कार्यक्रमात पुरुषांचा सन्मान होणे ही खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाची नांदी आहे. वर्षाताई इंगळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून कामात बारकाई दाखवतात. सरपंच सौ. ज्योती जाधव यांनी महिलांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी पत्रकार अशोक इंगळे, सचिन खंडारे, समाधान सरकटे, देविदास सरकटे, डी. एन. पंचाळ सर यांचा देखील आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या कळगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोदावरी इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहयोगिनी रेखा पवार, आशाताई राजगुरू, आशा राजेगावकर, कमल परांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.