– पहाटे तीनच्या सुमारास दुसरबीडजवळील शिवनी पिसानजीकची दुर्घटना; बस पूर्णतः जळून खाक!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – समृद्धी महामार्गावर मंगळवारी पहाटे सुमारे तीन वाजताच्या सुमारास मोठी दुर्घटना होता होता टळली. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने काही क्षणांतच बसने पेट घेतला. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच हालचाल केल्याने बसमधील सर्व ५२ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.
ही घटना सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड गावाजवळील शिवणी पिसा परिसरात घडली. बसमधून धूर येऊ लागल्याचे लक्षात येताच चालकाने तातडीने बस महामार्गाच्या कडेला थांबवली व प्रवाशांना खाली उतरवले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बस जळून खाक झाली. या घटनेत काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. बसला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.