– “आम्ही खातो तेच धान्य अधिकारीही खा”; संतोष भुतेकर व ओम गायकवाड यांचा पुरवठा विभागावर थेट हल्लाबोल!
चिखली/बुलढाणा (रंजना मोरे) – गोरगरिबांच्या पोटावर लाथ मारणारा आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार मातृतीर्थात उघड झाला आहे. शिधापत्रिकाधारक गोरगरिबांना पुरवठा विभागामार्फत किडे लागलेले, बोगस, उंदरांच्या लेंड्यांनी भरलेले ज्वारी-तांदूळ वाटले जात असताना प्रशासन मात्र ढिम्म झोपेत होते. अखेर युवासेनेने प्रशासनाच्या तोंडावरच निकृष्ट धान्याचा भात-भाकर नेऊन “हेच धान्य तुम्हीही खा!” असा संतप्त सवाल करत पुरवठा विभागाचा बुरखा फाडला.
युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर व विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ओम गायकवाड यांनी याबाबत याआधीच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना लेखी तक्रार दिली होती. मात्र प्रशासनाने नेहमीप्रमाणे कानाडोळा करत दुसऱ्यांदा पुन्हा तेच सडके धान्य गोरगरिबांच्या गळ्यात मारले. हा त्रास असह्य झाल्यानंतर दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी युवासेनेने थेट जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात घुसून अनोखे पण अंगावर काटा आणणारे आंदोलन छेडले. आंदोलक कार्यालयात निकृष्ट तांदळाचा भात, ज्वारीची भाकर व ठेचा घेऊन दाखल झाले. “तुम्ही आम्हाला हे खाताना पाहता, आम्ही खातोच; पण आता तुम्हीही खाऊन दाखवा!” असा थेट सवाल करत त्यांनी कार्यालयात ठाण मांडले.
मात्र जबाबदार असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी आंदोलकांना सामोरे जाण्याऐवजी पळ काढत दुसऱ्या कार्यालयात जाऊन बसणे पसंत केले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत आंदोलकांचे म्हणणे ऐकण्यास नकार देत “आम्हाला काहीही ऐकायचे नाही” असा उद्धटपणा दाखवण्यात आला. अखेर आंदोलक कार्यालय सोडणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने डॉ. ठाकरे यांना बाहेर यावे लागले. आंदोलकांच्या रोषासमोर नरमावत त्यांनी संबंधित तहसीलदारांना तातडीचे आदेश देत, “यापुढे निकृष्ट व बोगस धान्य खपवून घेतले जाणार नाही. दोषी पुरवठादारावर कठोर कारवाई केली जाईल आणि लेखी उत्तर दिले जाईल,” असे आश्वासन द्यावे लागले.
या घटनेने जिल्हा पुरवठा विभागातील भ्रष्ट साखळी, बेपर्वा अधिकारी आणि गोरगरिबांच्या जीवाशी चाललेला खेळ चव्हाट्यावर आला आहे. आता केवळ आश्वासन नव्हे, तर डोळ्यात अंजन घालणारी कारवाई झाली नाही, तर युवासेना रस्त्यावर उतरणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांच्याशी त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.