– १९९४ चा बॅच एकत्र; ओथंबून वाहिल्या आठवणी!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – “विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी तो शिक्षकांसाठी आणि विद्यालयासाठी विद्यार्थीच असतो. उद्योग क्षेत्रात कार्यरत असो वा मोठ्या पदावर पोहोचला असो, विद्यालयाशी प्रामाणिक राहणारा विद्यार्थीच खरा विद्यार्थी,” असे प्रतिपादन जिजामाता विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश ठोसरे यांनी केले. ते १९९४ मधील माजी विद्यार्थ्यांच्या आयोजित गेट-टू-गेदर कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक विनायक पंचाळ होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव पंजाबराव हाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विनायक गायकी, माजी प्राचार्य डी. एन. पांचाळ, रामेश्वर पाटील, वसंतराव पाटील, मुख्याध्यापक शिवशंकर मखमले, संतोष खरात, देविदास खिल्लारे, सुहास भावसार, बबनराव खिल्लारे आदी मान्यवर उपस्थित होते. जिजामाता विद्यालयात १९९४ मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम आयोजित करण्याची संकल्पना स्व. हरिश्चंद्र काटे यांची होती. त्यांच्या अकाली निधनानंतर कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. पुढे ही संकल्पना जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शिवदास रिंढे व प्रदीप तुपकर यांनी मांडताच सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त होकार दिला. सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. मनोगत व्यक्त करताना शिवदास रिंढे म्हणाले,“विद्यार्थी मोठा झाला तरी शिक्षकांसाठी तो विद्यार्थीच राहतो. आपण समाजाला काय देतो हे महत्त्वाचे. स्व. हरिश्चंद्र काटे यांच्याकडे आपुलकी वाढविण्याची विलक्षण कला होती. उद्योगपती असूनही त्यांनी कधीही बडेजाव दाखविला नाही; उलट सर्वांना मदतच केली. म्हणून त्यांची उणीव आजही जाणवते.” तसेच, दिवंगत सिद्धेश्वर लहाने यांच्या पत्नी वंदना लहाने यांनी संसाराचा गाडा सांभाळत मुलांना शिक्षण देऊन घडविल्याबद्दल त्यांचेही विशेष कौतुक व्यक्त करण्यात आले.
हार, तुरे, शाली यांना फाटा देत ग्रामगीता भेट देऊन सन्मान!
हार, तुरे, शाली यांना फाटा देत ग्रामगीता भेट देऊन सन्मान करण्याची संकल्पना मीरा दिंगबर मानतकर (तुपकर) यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षातही राबविली.कार्यक्रमात दिवंगत हरिश्चंद्र काटे यांची पत्नी हर्षा काटे, दिवंगत सिद्धेश्वर लहाने यांच्या पत्नी वंदना लहाने, दिवंगत शिक्षक पुरुषोत्तम मानतकर यांच्या पत्नी वंदना मानतकर तसेच शिक्षक संतोष मेरत यांच्या पत्नी गोदावरी मेरत यांचा साडी–चोळी देऊन सत्कार करण्यात आला. स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी प्रदीप तुपकर, शिवदास रिंढे, कैलास काटे, भुजंग गिरी, रवी काटे, गजानन पंचाळ, सुकदेव गव्हाणे आदींनी विशेष परिश्रम घेतले.