-चैत्यभूमीवर लाखोचा जनसागर उसळला; राजगृहावरही अनुयायांची मुंग्यासारखी रिघ!
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,”वंचित”चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसह मान्यवरांचे बाबासाहेबांना अभिवादन!
-लाखो पुस्तकांची खरेदी,बार्टीच्या स्टालवर झुंबड!बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे व्यवस्था चोख !
मुंबई / चैत्यभूमी (बाळू वानखडे): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर आज भाविकांचा लाखोंचा जनसागर उसळला. “हळू याना ग लाटांनो, कुणाला त्रास होईल ना… ईथे निजलाय भीम माझा, तयाला जाग येईल ना!” या भावपूर्ण ओळींच्या नादात मुंबईचे रस्ते सकाळपासूनच निळ्या लाटांनी फुलून गेले. देशभरातून आलेल्या अनुयायांच्या गर्दीने दादर ते शिवाजी पार्क परिसर अक्षरशः खचून गेला. चैत्यभूमीसमोर अविरत रांग सुरू असतानाच राजगृहावरही मुंगीसारखी रांग लागून भाविकांनी बाबासाहेबांच्या जतन केलेल्या वस्तूंना अभिवादन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांसह अनेक मान्यवरांनी चैत्यभूमीवर उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. या वेळी चैत्यभूमीचे व्यवस्थापक महाथेरो भंते बी. संघपाल उपस्थित होते. शिवाजी पार्क परिसरात उभारलेल्या पुस्तक प्रदर्शनात आज विक्रीचा अपूर्व असा लोट उसळला. विशेषतः बार्टीच्या स्टॉलवर सवलतीत दिल्या जाणाऱ्या साहित्यामुळे लाखो पुस्तकांची खरेदी झाली. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनीही सकाळी स्टॉलला भेट देऊन व्यवस्था पाहिली. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे चहा, नाष्टा, जेवण, पिण्याचे पाणी, विश्रांती व्यवस्था अशा सर्व सुविधा चोखपणे करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने स्वतंत्र जेवणाची व्यवस्था ठेवण्यात आली. विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आणि महापालिकेचे कर्मचारी दिवसभर कार्यरत होते. मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत ठेवली. जे.जे., केईएमसह इतर रुग्णालयांनी उभारलेल्या आरोग्य शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरांना वंचितचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांचे कौतुक केले. मध्य रेल्वेने अनुयायांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवून अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या.
संध्याकाळनंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या सभा पार पडल्या. विविध गायन पार्टींनी सादर केलेल्या भीमरगींनी वातावरण भारावून टाकले. मुंबईत आज निळ्या लाटांचा महासागर उसळला आणि बाबासाहेबांविषयीची श्रद्धा, निष्ठा आणि भावनिक नाते पुन्हा एकदा सामर्थ्याने प्रकट झाले.