– देवानंद पवार फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम
– निराधार शोभा आजीसह चार नातींना बांधून दिले हक्काचे घर!
– भांड्यासह अन्नधान्य देऊन वर्षभराची केली आबादानी!
– बोथा येथील आगळ्यावेगळ्या गृहप्रवेश सोहळ्यात आमदार खरातांसह उपस्थितांना गहिवरले!
मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – म्हणतात ना, धजोपती असला तरी देण्याची दानत लागते, अर्थात ती सर्वांकडेच नसतेही, तर दान देण्यासाठी आर्थिक परिस्थितीपेक्षा मानसिक स्थिती गरजेची असते हेही तितकेच खरे. मात्र देवानंद पवार व अॅड. माधुरी पवार हे बाप-लेक याला अपवाद ठरल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून मेहकर तालुक्यातील बोथा येथील ७५ वर्षीय निराधार शोभा भालेराव आजीसह चार नातींसाठी पदरमोड करून हक्काचे घर बांधून दिले. एवढेच नव्हे तर त्यांना भांडीकुंडी व वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्यही घेऊन दिले. या घराचा गृहप्रवेश सोहळा दि. २ एप्रिल रोजी तालुक्यातील बोथा या दुर्गम गावी थाटामाटात पार पडला. यावेळी आ. सिध्दार्थ खरातांसह उपस्थितांच्या डोळ्यातून आपसूकच आश्रू तरळतांना दिसले.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा ते मेहकर रोडवरील सिध्दांता आश्रमपासून दोन किलोमीटर अंतरावरील आडवळणावर असलेले बोथा हे तस दुर्गम गांव. याच गावात ७५ वर्षीय निराधार शोभा भालेराव आजी आपल्या चिमुकल्या चार नातीसह राहतात. आठराविशे दारिद्र्य पिच्छा सोडायला तयार नसतानाच, नातींचे मातृपितृक्षत्रही हरवलेले. त्यामुळे ७५ वर्षीय शोभा भालेराव आजी छातीचा कोट करून परिस्थितीशी चार हात करतेय व स्वतःसह नातींचे पालनपोषण करते. याबाबत येथील संवेदनशील शिक्षक अमित शिंगणे यांना माहिती झाली. त्यांनी या कुटुंबाशी संपर्क साधत तब्बल तीन वर्षापासून कोणत्या ना कोणत्या प्रकारे या कुटुंबाच्या मदतीसाठी हात पुढे ठेवला.
शोभा आजीला घरकुल मिळाले होते, परंतु धो धो पावसात ते वाहून गेल्याने त्या दहा बाय दहाच्या छोट्या पडक्या घरात वास्तव्य करीत होत्या, असे शिक्षक अमित शिंगणे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला सांगितले. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार व देवानंद पवार फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड.माधुरीताई पवार यांना मिळताच, अॅड. माधुरी पवार यांनी शिक्षक अमित शिंगणे यांच्यासह या निराधार कुटुंबाची भेट घेतली. तातडीने सूत्र हलवत त्यांनी आठ दिवसांत टिन शेडच्या टुमदार दोन खोल्या त्यांना बांधून दिल्या, एवढेच नव्हे तर त्यांना वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य, यासोबतच गादी, पलंग, पंखा, आरसा, कंगवा यास नित्यपयोगी सर्वच साहित्यदेखील घेऊन दिले.
या घराचा गृहप्रवेश सोहळा परवा, दि. २ मे रोजी बोथा येथे थाटामाटात पार पडला. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, या भालेराव कुटुंबाला शासनस्तरावरून काय मदत करता येईल, याबाबत संबंधितांची बोलतो असे सांगताना त्यांनादेखील गहिवरून आले. यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्याम उमाळकर, माजी सभापती नंदकिशोर बोरे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, आशीष राहाटे यांनी मार्गदर्शनातून देवानंद पवार व अॅड. माधुरी पवार यांच्या सामाजिक उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. प्रास्ताविकातून अॅड. माधुरी पवार यांनी शोभा भालेराव कूटूंबाच्या व्यथा सांगून, देवानंद पवार फाऊंडेशनने यासाठी खारीचा वाटा उचलला असून, आणखीही मदतीचे हात पुढे यावे, असे आवाहन केले.
यावेळी शिक्षक अमित शिंगणे यांनी शोभा भालेराव कुटुंबाच्या व्यथा शासनदरबारी मांडताना आलेल्या अडचणी सांगितल्या, यासाठी विशेषतः तहसीलदार नीलेश मडके यांच्यासह काहींचे सहकार्य झाल्याचेही ते म्हणाले. शिवसेना (ठाकरे) शहरप्रमुख किशोर गारोळे, दिगंबर मवाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भास्कर ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य रमेश धोत्रे, विश्वास सवडतकर, शैलेश बावस्करसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. संचलन शिक्षक गणेशकर यांनी केले. गृहप्रवेश सोहळ्यात अनेकांना गहिवरून आल्याचे दिसले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.