– सरपंच यांचा आरोप; ग्रामपंचायत रेकॉर्डवरून पडली वादाची ठिणगी!
– चार कर्मचारी कमी केले, पगारही दिले नाही – माजी सरपंच
– विधायक कार्याला महत्त्व दिले पाहिजे – कमलाकर गवई
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा ग्रामपंचायतमधील दोन ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे साखरखेर्डा गावात एकच खळबळ उडाली होती. यामागचा मागोवा घेतला असता, ग्रामपंचायतमधील रेकॉर्ड हे माजी सरपंच यांच्या घरी असल्याने हा वाद निर्माण झाला. तर मागील दोन महिन्यांचे कर्मचार्यांचे वेतन न दिल्याने राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. यावर आज पडदा पडला असला तरी भविष्यात अंतर्गत वाद निर्माण होऊ शकतात. ते होऊ नये म्हणून विधायक कार्याला महत्त्व दिले पाहिजे, असे मत अनेक ग्रामपंचायत सदस्य यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाले. सकाळी झेंडावंदन झाल्यानंतर सरपंचपती अमित जाधव यांनी ग्रामपंचायत रेकार्ड संबंधित माहिती ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे यांना विचारली. त्यांनी रेकॉर्ड माजी सरपंच यांच्या घरी असल्याचे सांगितले. त्यांना तत्काळ नोटीस बजावून रेकॉर्ड जमा करण्याचे आदेश देण्याचे सांगितले. त्यानुसार चनखोरे यांनी नोटीस बजावली. यावरून वाद निर्माण झाला. मागील कामाचे हिशोब बाकी असल्याने ते पैसे देण्यात यावे. जे चार कर्मचारी कमी केले त्यांचे पगार करण्यात यावे, अशी मागणी माजी सरपंच सुमनताई जगताप यांनी केली. त्यांचे वेतन आणि मागील कामाचे पैसे देण्यात यावे, असा हट्ट जगताप यांनी धरला. या दोघांची मध्यस्थी करणारे माजी सरपंच कमलाकर गवई यांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाद टोकाला भिडल्याने कमलाकर गवई यांनी आपल्या पत्नीचा गंगुबाई कमलाकर गवई यांचा सदस्य पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडले. ग्रामपंचायत ही विधायक कामासाठी असून, जर अंतर्गत वाद निर्माण होत असतील, तर त्या पदावर राहायचे कशाला, अशी प्रतिक्रिया कमलाकर गवई यांनी दिली. हा वाद टोकाला जाऊ नये, म्हणून ललित अग्रवाल यांनी मध्यस्थी करून दोघांनाही राजीनामे परत घेण्यासाठी विनंती केली. दोन्ही राजीनामे पार्टी नेते रामभाऊ जाधव यांच्याकडे आले. त्यांनी राजीनामा मंजूर न करता गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र बसून काम करण्याचा सल्ला सर्व सदस्यांना दिला. अंतर्गत काय हिशोब बाकी असेल ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यांनतर नवनिर्वाचित उपसरपंच यांची निवडणूक घेण्यात आली. सर्व सदस्यांनी अंकिता संग्रामसिंह राजपूत यांना पाठिंबा दिला.
साखरखेर्डा ग्रामपंचायत निवडणूक ही सात ते आठ महिन्यावर येऊन ठेपली आहे. या आठ महिन्यांत गावात विधायक कार्याला महत्त्व देणे आवश्यक आहे. सहा ते सात महिन्यांसाठी पदावरून दूर होऊन काहीही साध्य होणार नाही येवढे मात्र निश्चित.