– चिखली तालुका सरपंच संघटनेचे अंढेरा ठाणेदार रूपेश शक्करगे यांना निवेदन
– मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, इसरूळ, मंगरूळसह परिसरातील अवैध दारूचा मुद्दा गंभीर
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – अंढेरा पोलिस ठाणेहद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू असून, इसरूळ, शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, मंगरूळसह परिसरातील गावांतील अवैध दारूविक्री तातडीने थांबवून, संबंधित दारूविक्रेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील आदींनी ठाणेदार रूपेश शक्करगे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अंढेरा पोलिस ठाणेहद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री वाढली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असून, गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तसेच, महिलावर्गांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. अवैध दारूविक्रेत्याने नुकताच एका पोलिस कर्मचार्याचा बळीदेखील घेतला आहे. मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, इसरूळ, मंगरूळ येथे तर खुलेआम दारूविक्री सुरू असून, दारूविक्रेत्यांवर पोलिसांचा काहीच धाक उरलेला नाही. तेव्हा, परिसरातील गावांतील अवैध दारूविक्री तातडीने बंद करावी, अशी मागणी सरपंच सतिश पाटील भुतेकर, डॉ. विकास मिसाळ यांच्यासह मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, मंगरूळचे माजी सरपंच कॉ. दामूअण्णा शिंदे, इसरूळचे ग्रामपंचायत सदस्य भिकनराव भुतेकर, शेळगाव आटोळचे ग्रामपंचायत सदस्य बाजीराव देशमुख, प्रभाकर भुतेकर इसरूळ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
———-