– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा दणका!; शिंदी येथील पाणीटंचाईची वरिष्ठ पातळीवर दखल
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – शिंदी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात अनियमितता आढळून आल्याची माहिती उपअभियंता पाणीपुरवठा विभाग यांनी घटनास्थळी भेट देऊन जाणून घेतली. या योजनेचे काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदार यांना नोटीस बजावून काम करण्याचे आदेश देण्यात येईल. जर ठेकेदाराने काम न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता गिरीश मालोकार यांनी शिंदी येथील सरपंच यांना दिले.

शिंदी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून १ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद करीत नळयोजना मंजूर करण्यात आली होती. या कामाचे स्वरूप गायखेडी तलावात विहीर, पाईपलाईन, मोटार पंप, जलकुंभ, गावातील वितरण व्यवस्था पाईप लाईन टाकण्यात यावी, अशी कामे होती. संबंधित ठेकेदार यांनी विहीर बांधकाम केल्यानंतर त्या विहिरीत मोटारपंप बसविला नाही. गावापर्यंत पाईप लाईन टाकताना कोणतेही नियम पाळले नाही. वितरण व्यवस्था केली नाही. असे अनेक कामे रेंगाळत ठेवली आहे. त्यामुळे चार वर्ष झाली तरी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. यावर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शिंदी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी पुन्हा विहीर अधिग्रहण प्रस्ताव मांडावा लागतो आहे. विहीर अधिग्रहण करीत असताना मागील दोन वर्षांपासून अधिग्रहित विहीरीचे पैसे मिळालेच नसल्याने शेतकरी अधिग्रहण करु देत नाही. अशा बिकट परिस्थितीचा सामना ग्राम पंचायतीला करावा लागत आहे. या बाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करुन शासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत आज पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता गिरीश मालोकार यांनी शिंदी येथे भेट देऊन पाणीपुरवठा विहीरीची पाहणी केली. त्यावेळी त्यांना खरी परिस्थिती दिसून आली. त्यांनी सरपंच साधना खरात यांना संपूर्ण काम लवकरच पूर्ण करून पाणीपुरवठा करण्यासाठी आणखी काही उपाययोजना करता येतील का, याबाबत चर्चा केली. संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेसुध्दा त्यांनी सांगितले. यावेळी कनिष्ठ अभियंता रजत मराठे, पीएमसीचे अरुण भुतेकर, ग्रामसेवक दिनकरराव काळे, आदर्श गाव समिती सदस्य संतोष बंगाळे हजर होते.
—-