– झोटिंगा गावावर शोककळा; आईचा एकुलता एक मुलगा, तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेला!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा तालुक्यातील झोटींगा येथील वैभव मधुकर डिघोळे (वय २५) या युवकाचा पुणे येथे, दि. २४ मार्च रोजी अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
वैभव डिघोळे हा पुणे येथे एका कंपनीत आय टी इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. २४ मार्च रोजी रात्री ९:३० वाजता कंपनीतून रुमवर परत येत असताना हांडेवाडी रोडवर मार्गावरुन येत असलेल्या ट्रकने मोटारसायकला जबर धडक दिली. या अपघातात वैभव हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डोक्याला, पोटाला जबर मार लागला होता. हात, पायालाही मार लागला होता. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही बातमी झोटींगा गावात पसरताच शोककळा पसरली. मधुकर डिघोळे यांना एकुलता एक मुलगा होता. वडिलांचे चार वर्षांपूर्वी छत्र हरविल्यानंतर संपूर्ण जबाबदारी मामा डॉ. पंजाबराव जायभाये यांनी सांभाळली. वैभवला उच्च शिक्षण देऊन इंजिनिअर केले. त्यानंतर आणि आई निर्मला डिघोळे, बहिण भाग्यशाली गजानन वाघ, पूजा सचिन सांगळे आणि वैशाली डिघोळे यांची जबाबदारी वैभववर आली. परंतु, त्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आई आणि तीन बहिणीचे छत्र हरविले आहे. आज, दि.२५ मार्च रोजी झोटींगा येथे मोठ्या शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.