– अजूनही वेळ गेली नाही, पंतप्रधान मोदींशी चर्चा करा – शिंदे गटाचा सल्ला
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दाबा सांगण्याची शक्यता पाहाता, ठाकरे यांनीच आपल्या निष्ठावंत व जिल्हा प्रमुखांना ‘तयारीत राहण्याच्या’ सूचना केल्या आहेत. तसेच, निवडणूक चिन्ह वाचविण्यासाठी कायदेशीर लढाईची तयारीदेखील चालवली आहे. दुसरीकडे, शिंदे गटानेही अद्याप वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी, असा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांनी केलेले पक्षादेशाचे उल्लंघन, राज्यपालांनी तातडीने विशेष अधिवेशन घेण्याचे दिलेले आदेश, विधानसभेच्या अध्यक्षांची निवड याबाबतीत संवैधानिक तत्वांचे उल्लंघन झाल्याबद्दल उद्धव ठाकरे गटाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाने आपणच अधिकृत शिवसेना असल्याचे सांगून, शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर म्हणजे धनुष्यबाणावर दावा सांगण्याची तयारी चालवली आहे. चिन्ह गेल्यास काय? या हिशोबाने उद्धव ठाकरे यांनीही तयारी चालवली असून, निष्ठावंत व जिल्हा प्रमुख यांच्याशी चर्चा करताना ठाकरे यांनी ‘तयारीत राहण्याचे’ निर्देश दिले आहेत. तसेच, जिल्हा प्रमुखांकडून प्रतिज्ञापत्रेही घेतली जात आहेत. गरज पडल्यास नवे चिन्ह घरोघरी पोहोचविण्यासाठी तयारीत राहण्याचेही त्यांनी सूचित केले आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले, की उद्धव ठाकरे यांच्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे चांगले संबंध आहेत. त्यांनी थेट मोदींशी चर्चा करावी. त्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली तर पुढील मार्ग प्रशस्त होईल. ते दोघे अजूनही जवळ येऊ शकतात, असेही केसरकर यांनी सांगितलेले आहे.
——————-
उद्धव ठाकरेंना “धनुष्यबाण” गमाविण्याची भीती!