– कामकाजात सुधारणा करणे, कोणतीही अडचण येऊ देणार नसल्याची आयजींची ग्वाही
नगर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलबाबत फॅमिली कोर्ट अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्यावतीने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे गंभीर स्वरुपाच्या तक्रारी करण्यात आल्या असून, या सेलमधील अनागोंदी व मनमानीबाबत ऐकून वरिष्ठ अधिकार्यांना धक्का बसला. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल हेदेखील उपस्थित होते. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी तातडीने कामकाजात सुधारणा करण्यात येतील व यापुढे कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
फॅमिली कोर्ट अॅडव्होकेट बार असोसिएशन अहमदनगरचे पदाधिकारी यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी जी शेखर पाटील यांची नुकतीच भेट घेतली. पोलिस प्रशासन आणि भरोसा सेल यांचेकडून येणारे अडीअडचणीसंदर्भात चर्चा केली. त्यावेळी नगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल हेदेखील उपस्थित होते. सर्व पोलिस अधिकारी यांचा फॅमिली कोर्ट अॅडव्होकेटस् बार असोसिएशन अहमदनगरचेवतीने सत्कार करण्यात आला.
असोसिएशनच्यावतीने विविध अडीअडचणीबाबत शेखर पाटील यांना अवगत करण्यात आले. आमची कोणत्याही पोलिस अधिकारी यांचे विरोधात तक्रार नाही, पण वकील आणि पक्षकार यांना वाईट प्रकारची वागणूक मिळू नये व त्यांचे अखत्यारीत असणारे कामे वेळेवर व्हावीत, हिच अपेक्षा वकील संघाची आहे, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर त्यांनी सांगितले की, यापुढे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. याबाबत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना पण मदत करण्यासाठी सांगितले असता, त्यांनी व एएसपी अग्रवाल यांनीसुध्दा मदत करण्याचे आश्वासन दिले.
फॅमिली कोर्टमधून गेलेले समन्स, वॉरंट यांची बजावणी वेळेवर होत नाही, तसेच रिपोर्टसुद्धा वेळेवर येत नाहीत. महिलांना आणि पुरूषांना त्यांचे फॅमिली प्रकरणात मदत करणे कामी भरोसा सेलची निर्मिती अहमदनगर येथे झाली आहे. परंतु अनेक लोकांना तेथे मेडिएशनसाठी असलेले मेडिएटर व्यवस्थित वागणूक देत नाहीत. तसेच एखाद्या व्यक्तीचे न्यायालयात प्रकरण चालू असेल, तर त्याबाबतसुद्धा दखल घेतली जात नाही. तसेच वकीलांनासुद्धा चांगली वागणूक मिळत नाही. यामुळे भरोसा सेलमध्ये प्रशिक्षीत आणि अनुभवी महिला व पुरुष पोलिसांची नेमणूक केली तर असे प्रश्न उद्भवणार नाहीत, अशी विनंती वकील संघाचे पदाधिकारी यांनी केली आहे. या बाबतीत पोलिस प्रशासन यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शिवाजी अण्णा कराळे यांनी दिली आहे.
याभेटीप्रसंगी असोशिएशनचे उपाध्यक्ष अॅड. लक्ष्मणराव कचरे, कार्याध्यक्ष अॅड सुरेश लगड, सचिव अॅड अनिताताई दिघे, सहसचिव अॅड अर्चनाताई शेलोत, खजिनदार अॅड राजेश कावरे, सदस्य अॅड एम बी अंबेकर, अॅड राजाभाऊ शिर्वेâ, अॅड. शिवाजी सांगळे, अॅड अनुराधाताई येवले, अॅड सुचिताताई बाबर, अॅड सत्यजीत कराळे हे उपस्थित होते.
—————–