– दारूबंदीच्या अधिकार्यांची धडक मोहीम, गावात येऊन केल्या कारवाया!
चिखली (विशेष प्रतिनिधी) – डोंगरखंडाळा येथे महिलांनी ग्रामसभा घेऊन गावात दारूबंदीचा ठराव घेतला, व या ठरावाची प्रत दारुबंदी विभाग व ग्रामीण पोलिस ठाणे यांना दिली होती. त्यानुसार, या दोन्ही यंत्रणांनी गावात येऊन डोंगरखंडाळा व वरवंड येथील दारूविक्रेत्यांविरोधात धडक कारवाईचे सत्र राबविले. वरवंड येथे घरोघरी जाऊन दारू पकडली तर डोंगरखंडाळा येथे दारूविक्रेत्यांच्या हातभट्ट्या फोडण्यात आल्यात.
दारूबंदी विभागाचे अधिकारी शिंदे, चव्हाण यांनी महिलांच्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन कारवाईची मोहीम राबविली. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच आणि गावातील तरुण तडफदार युवक पोलिसांच्या मदतीसाठी उपस्थित होते. या गावठी दारूमुळे डोंगरखंडाळा आणि वरवट येथील तरुण मुले या एका महिन्यात जवळपास दहाजण दारूमुळे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे वरवंड ग्रामपंचायत तसेच डोंगरखंडाळा ग्रामपंचायतीने दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. यापुढे जर कोणी दारू विक्रेता वरवंड किंवा डोंगरखंडाळ्यात दारू विकेल तर त्याला कठोर शिक्षा केली जाणार आहे. तसेच, यापूर्वी दारू विक्रेत्याच्या विरोधात कोणी पुरावा देत नव्हते. परंतु आता वरवंड, डोंगरखंडाळा येथील सरपंच, उपसरपंच तथा गावातील ग्रामस्थ दारूबंदीविरोधात पुरावे देणार आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिलेली आहे.
——————–