– भुजबळ हे विकास करणारे उत्तम राजकारणी – शरद पवार
– शिवसेनेत राहिले असते तर आधीच मुख्यमंत्री झाले असते – उद्धव ठाकरे
– भुजबळांची मदत घेतली असती तर तुम्ही आज मुख्यमंत्री असता – अजितदादांचा उद्धव ठाकरेंना अजब सल्ला
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – कुठल्याही कामाचा निश्चय केल्यानंतर ते त्यात झोकून काम करणे हा भुजबळांचा गुण आहे. भुजबळ यांचे नेतृत्व शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व आहे. त्यांनी अनेक खस्ता खाल्या. शिवसेनेचे नेतृत्व, नगरसेवक, पहिले आमदार, महापौर होत मुंबईचे नेतृत्व त्यांनी केले. पायाभूत विकास केला. पुढे विधानसभा, विरोधी पक्षनेता, मंत्री म्हणून काम करताना विकासाला दिशा देण्याचे आगळे वेगळे काम केले. देशात विकास करणारा उत्तम राजकारणी नेते म्हणून भुजबळांचा उल्लेख करावा लागेल, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीच्यावतीने आज मुंबईतील ‘षण्मुखानंद’ सभागृहात अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थिती होती. सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली मात्र भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निमंत्रण असूनही गैरहजेरी लावली. या कार्यक्रमात राजकीय नेत्यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष फटकेबाजी केली. ठाकरे यांच्या भाषणापूर्वी अजित पवार यांनी म्हटले की, भुजबळ साहेब जरा चार महिने लवकर आले असते तर मुख्यमंत्री झाले असते. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांनी जर शिवसेना सोडली नसती तर त्याच्याही अगोदर मुख्यमंत्री झाले असते.
उद्धव ठाकरे हे भुजबळांच्या अमृत महोत्सव सोहळ्याला उपस्थित असतांना जम्मू-काश्मीरचे नेते तथा माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुलादेखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, वयाचे आणि महाराष्ट्राचे अंतर जास्त असल्याने अब्दुला यांची भेट होत नाही, पण ते बाळसाहेबांचे चांगले मित्र होते. पण ते मला आत्ता भेटले तेव्हा म्हणाले, अजिबात घाबरू नकोस, लढ वडिलांसारखा लढ, ही लढाई आम्ही सोडणार नाही, असा पुनरुच्चार ठाकरेंनी केला. याशिवाय, तुम्ही सर्वजण सोबत असल्यावर मी लढाईचीच वाट बघतोय, असे म्हणत येणार्या निवडणुकीत उद्धव ठाकरे संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याचा संकेत त्यांनी दिले. भाषणात अजित पवारांनी १९९९ मध्ये आणखी चार महीने वेळ मिळाला असता, तर राज्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून सर्वाधिक जागा निवडून आल्या असत्या, आणि छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, असे सांगितले होते. तोच संदर्भ जोडत उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांना शुभेच्छा देत असतांना अजितदादा तुम्ही छगन भुजबळ हे मुख्यमंत्री कधी झाले हे सांगितले, पण मी सांगतो ते शिवसेनेत असते तर त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते, असे विधान केल्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाल्याचे पाहायला मिळाले.
शरद पवार पुढे म्हणाले की, छगन भुजबळ हे माझे ज्येष्ठ सहकारी असून त्यांची ६१ वी व आता अमृतमहोत्सला उपस्थित आहे. मी त्यांच्या कायम पाठिशी आहे. देशात सावित्रीबाई, महात्मा फुले यांचे विचार पुढे नेण्याचे काम भुजबळ करत आहे. मी ज्या पुणे विद्यापीठात शिक्षण घेतले त्या विद्यापीठाला फुले यांचे नाव भुजबळांमुळे मिळाले याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले, छगन भुजबळ यांनी राजकारण, समाजकारण केले. क्रीडा, नाटक, चित्रपट, अभिनय अशा अनेक गोष्टीत ते रमतात. जीवनाचा मनापासून आनंद घेणारे असे हे व्यक्तिमत्व आहे. चित्रपटात काम केले. फार मोठ्या नटसम्राटाला महाराष्ट्र मुकला. नाहीतर बाकीच्यांचे काही खरे नव्हते. १९८५ दैवत, १९९० मध्ये नवरा बायको या दोन चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली, याची आठवण पवारांनी छगन भुजबळांच्या बाबतीत करून दिली. शिवसेनेचे १५ आमदार पक्षातून बाहेर पडल्यावर उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळ (राष्ट्रवादीचे नेते) यांची मदत घ्यायला हवी होती, असे अजित पवार म्हणाले. छगन भुजबळ हे अशा परिस्थितीचे मास्टर आहेत. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता, तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिसला असतात, असे सांगून गेलेले सरकार भुजबळ यांनी आणले. ठोसास ठोसा कसा द्यायचा याचे उदाहरण म्हणजे छगन भुजबळ. नुसत राजकारण केले नाही. शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली, हेही अजित पवारांनी सांगितले. पण, सध्या राज्याची राजकीय संस्कृती लोप पावत चालली आहे, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राची एक संस्कृती आणि परंपरा आहे. अनेक वर्षे आपण अनेक मान्यवरांचे सत्कार पाहत आलो आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते आणि राजकीय मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेऊन तेही छगन भुजबळांबाबत बोलले असते, तर महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा अधिक ठळकपणे समोर आला असता, असा टोलाही त्यांनी फडणवीस व शिंदे यांना हाणला.