– दिवाळी गोड! जून ते ऑगस्टदरम्यानच्या अतिवृष्टीची भरपाई लगेचच मिळणार!
एकनाथ माळेकर/प्राची कुलकर्णी
बुलढाणा/मुंबई : एकीकडे चिखलीचे तहसीलदार हे ६५ मिलिमीटरच्या निकषात बसत नाही म्हणून अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे टाळत असले तरी, या तहसीलदारांना चपराक लावणारा शासन आदेश आजच राज्य सरकारने जारी केला आहे. त्यानुसार, अतिवृष्टीसाठी ६५ मिलीमीटर पावसाचा निकष सरकारने काढला असून, विशेष बाब म्हणून तेथील नुकसानग्रस्त शेतकर्यांनाही निधी देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ३० सप्टेंबररोजीदेखील राज्य सरकारने निकषात न बसणार्या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय घेतला होता.
जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना सरकारने यातून मोठा दिलासा मिळाला आहे. एसडीआरएफच्या निकषापलीकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असून, आतादेखील चिखली, लोणार, मेहकर, बुलढाणा या तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत करण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.
सध्या राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून, या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून मदतदेखील दिली जाणार आहे. मात्र निकषात न बसणार्या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. अशा निकषात न बसणार्या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना विशेष बाब म्हणून मदत केली जाणार आहे. याबाबत शासन निर्णयदेखील जारी झाला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर हा जीआर काढण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात शासन निर्णय काढून जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आज मदत व पुनर्वसन विभागाने ७५५ कोटी रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांना वितरण करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व निकषात न बसणार्या शेतकर्यांना सरकारने यातून मोठा दिलासा दिला असल्याने शेतकर्यांची दिवाळी गोड होणार आहे.
दरम्यान, दिवाळ सणादरम्यान साधारण २० ते २४ ऑक्टोबरदरम्यान राज्यात आणखी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकरी धास्तावलेला आहे. त्यामुळे आणखी नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ शेतकर्यांवर आलेली आहे. उद्यापासून राज्यात मान्सून माघारी फिरण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
मूळ जीआर वाचण्यासाठी येथे क्लिक करा..