पत्रकार भवनासाठी 50 लाखांचा निधी देणारे धर्मवीर आ. संजय गायकवाड हे प्रमुख उदघाटक
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्हा पत्रकार भवन ‘वास्तू शब्दपूर्ती सोहळा’ अर्थात पत्रकार भवनाच्या विस्तारीत बांधकाम व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन रविवार, २ ऑक्टोबर रोजी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख, व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे व लोकमतचे किरण अग्रवाल यांच्या हस्ते होत असून, अध्यक्षस्थानी खा.प्रतापराव जाधव राहणार आहेत. तर या भवनासाठी ५० लाख रुपये निधी देणाऱ्या धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
बुलढाणा जिल्हा पत्रकार भवनाच्या वास्तूचे पहिल्या मजल्याचे बांधकाम शासकीय निधीतून पुर्ण झाले होते. त्यावेळी म्हणजे १९९७ला तत्कालिन तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी भुमिपूजन केले होते. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वंभर वाघमारे व सरचिटणीस समाधान सावळे व सदस्यांच्या प्रयत्नातून ते पुर्णत्वास आले. परंतू निधीअभावी पुर्ण काम होवू न शकल्याने २००९ मध्ये अनिल म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ५ जणांच्या अस्थायी जिल्हा पत्रकार संघ पदाधिकारी व अन्य पत्रकारांनी लोकसहभागातून हे काम पूर्ण करुन तत्कालिन मंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ६ जानेवारी २०१० या पत्रकार दिनी भवनाचे उद्घाटन केले.
त्यानंतर विस्तारीकरणासाठी अनेकदा प्रयत्न झाले. ना. भाऊसाहेब फंडकर पालकमंत्री असतांना त्यांनी १०लाख रु. तर डॉ.संजय कुटे पालकमंत्री असतांना त्यांनी २५ लाख रु. चा निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर केला होता. परंतू, तो हे दोघेही मंत्रीपदावरुन गेल्याने मिळू शकला नाही. म्हणून पत्रकारांनी यासाठी आ.संजय गायकवाड यांची भेट घेतली असता, त्यांनी दोनच दिवसांत ३५ लाख रुपये व नंतर ते वाढवून ५० लाख रुपये केवळ मंजूरच केले नाहीतर कामाची ऑर्डरही आणली व हे काम आता २ ऑक्टोबरपासून सुरु होत असून, त्याचेच हे भुमिपूजन होत आहे. या कार्यक्रमासाठी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, आ.डॉ.संजय कुटे, आ.डॉ.संजय रायमूलकर, आ.आकाश फुंडकर, आ. श्वेताताई महाले व आ.राजेश एकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विशेष सत्कारमूर्ती म्हणून बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपस्थित राहणार आहेत, याच दिवशी २ ऑक्टोबरला भाईजींचा वाढदिवस आहे.. हे येथे विशेष! रविवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.