– देऊळगावराजा तहसीलदार म्हणतात, ‘स्थानिक सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनीही लक्ष द्यायला पाहिजेत!’
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वाळूतस्करीचा भंडाफोड केल्याने तीन दिवसांत १० ते १५ लाखांची वाळूचोरी वाचली; वाळूतस्करांवर आमची नजर कायम राहणार!
सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यांच्या हद्दीतून वाहणार्या खडकपूर्णा नदीतून खुलेआम बोटींच्या सहाय्याने वाळूउपसा करून, मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी करणार्या वाळूतस्करांना अखेर देऊळगावराजा तहसीलदारांनी दणका दिला आहे. वाळूउपसा करणारी बोटच महसूल पथकाने पाण्यात बुडवून टाकली आहे. नायब तहसीलदार व तलाठ्यांचे हे पथक वाळूतस्करांविरोधात कारवाई करण्यासाठी गेले होते. परंतु, वाळूतस्कर हे पथक येण्यापूर्वीच पळून गेलेले होते. त्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा करून, महसूल पथकाने सदर बोट नष्ट करण्याच्या उद्देशाने जवळपास ३० ते ४० फूट खोल पाण्यात बुडवून टाकली. दरम्यान, निमगाव वायाळ व डिग्रस बुद्रूक या दोन गावांच्या नदीपात्रातून दिवसाढवळ्या सुरु असलेल्या वाळूतस्करीबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने भंडाफोड केला होता.
याबाबत जिल्हाधिकारी एस. रामामूर्थी यांनाही ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने माहिती दिली होती. तसेच, वरिष्ठ महसूल आयुक्त व अधिकारी यांनाही याबाबतचे वृत्त अवलोकनार्थ पाठवले होते. त्यामुळे महसूल प्रशासनावर दबाव निर्माण झाल्याने अखेर देऊळगावराजा तहसीलदारांनी कारवाई केली आहे. तथापि, वाळूचे साठे जप्त करणे, व वाळूतस्करी करणार्यांचा शोध घेऊन त्यांच्या मालमत्तांवर बोझा चढविण्याचे काम तहसीलदार कधी करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खडकपूर्णा नदीपात्रात बोटींच्या सहाय्याने सिंदखेडराजा हद्दीतून वाळूउपसा करायचा, तर वाळूसाठा मात्र देऊळगावराजा तालुका हद्दीत करायचा, व तेथून वाळूची चोरटी वाहतूक करायची. अशाप्रकारची शक्कल वाळूतस्करांनी लढविली होती. तसेच, त्यांना महसूल अधिकार्यांचा वरदहस्तही असल्याची खासगीत चर्चा होत आहे. महिनाकाठी दीड ते दोन कोटींची वाळूचोरी येथून होत असून, त्याचा मलिदा कोणते अधिकारी घेत आहेत? याबाबत गोपनीय शाखेने किंवा तपास यंत्रणांनी स्वतंत्र तपास करण्याची गरज आहे. दरम्यान, या धक्कादायक वाळूतस्करीबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सडेतोडपणे राज्यस्तरावर वृत्त प्रसारित करताच, वाळूतस्करांचे धाबे दणाणले होते. गेले दोन दिवस त्यांनी वाळूचोरी थांबवली होती. या दोन दिवसांत या वाळूतस्करांचे १० ते १५ लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती विश्वासनीय सूत्राने दिली आहे.
या शिवाय, देऊळगावराजा महसूल पथकाने आज घटनास्थळी पोहोचत, वाळूतस्करांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते पळून गेलेले होते. त्यामुळे तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने पाण्यातून वाळूउपसा करणारी बोटच ताब्यात घेत, ती अंदाजे ३० ते ४० फूट पाण्यात बुडवून टाकली. ही कारवाई देऊळगावराजाचे नायब तहसीलदार, देऊळगावमहीचे मंडळ अधिकारी, डिग्रसचे तलाठी व कोतवाल यांनी आज सकाळी केली आहे. यावेळी सिंदखेडराजा तहसीलचे नायब तहसीलदार व तलाठीदेखील हजर होते. या महसूल पथकाने थातूरमातूर का होईना कारवाई केली असली तरी, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ची टीम येथील वाळूतस्करीवर कायम नजर ठेवून राहणार आहे.
दरम्यान, आपल्या हद्दीत वाळूचोरी सुरु आहे, आपण कार्यवाही का करत नाही, याबाबत देऊळगावराजाचे तहसीलदार धनवणे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी या वाळूचोरीबाबत स्थानिक पदाधिकार्यांनीही लक्ष घालावे, असा सल्ला दिला. ते म्हणाले, वाळूचोरी रोखण्यासाठी संबंधित गावांच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनीही लक्ष घालायला पाहिजेत.
तर, खडकपूर्णा नदीपात्रातून वाळूचोरी ही गंभीर बाब इकडे नेहमीचीच झाली असून, वाळूतस्कर कुणाचेही जुमानत नाही. तर महसूलचे अधिकारीच त्यांच्यावर अर्थपूर्ण व्यवहारातून वरदहस्त ठेवत आहेत, अशी प्रतिक्रिया ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना निमगाव वायाळचे सरपंच शिवशंकर वायाळ यांनी दिली आहे. ते म्हणाले, की ‘वाळूतस्करांनी बोटीच्या सहाय्याने वाळूतस्करी चालवल्यामुळे शेताशेजारी खूप मोठे भगदाड पडलेले आहे. नदी, पर्यावरण याची हानी तर होतच आहे; पण शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलदेखील बुडत आहे. वाळूतस्करांनी नदीत मोठमोठे खड्डे केलेले असून, पाऊस झाला असता, या खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा जीवदेखील गेलेला आहे. वाळूचोरीमुळे शासनाचा महसूल तर बुडतोच; परंतु या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झालेला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी या भागातील वाळूउपसाच बंद करावा, अशी मागणीही सरपंच शिवशंकर वायाळ यांनी केली आहे.
——————