मेहकर (ब्रेकिंग महाराष्ट्र):- जिल्ह्यात अवैध धंदे दारूविक्री , गुटखा , वरलीमटका, जुगार जोमात सुरू आहेत. मेहकर तालुक्यातील “भोसा गाव तस चांगलं पण अवैधधंदे दारू विक्री व वरलीमुळे वेशीवर टांगल” या म्हणीचा प्रत्यय येत असून गावात दारूचा महापूर तर वरली जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे तर शासन प्रतिबंधित गुटखा सुद्धा सर्रासपणे विकल्या जात आहे. तसेच एक्का बादशहा रम्मी जुगार असे पत्यांचे खेळ पैशाच्या हारजितवर सुरू आहेत.या सर्व गोष्टींकडे पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावातील महिला आणि नागरीक करीत आहे. तरी गावातील अवैध धंदे बंद न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला आहे. याकडे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक यांच्यासह पोलीस विभाग , एलसीबी आणि राज्य उत्पादन शुल्क( दारूबंदी ) विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
मेहकर तालुक्यातील भोसा हे गाव आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखल्या जाते. येथील नागरिक शेतीवर आपला उदरनिर्वाह चालवितात. येथे लोकांना अनेक समस्यांच्या सामना करावा लागत आहे. त्यातच अवैध धंद्यांना उत आला आहे. गावात गावरान हातभट्टी दारू तसेच देशी – विदेशी दारूची विक्री जोमात सुरू आहे. या अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.गावात भांडण तंटे वाढले आहेत.दारू मुळे पती – पत्नीत वाद होत आहे. 30 रुपयात 1 ग्लास दारू मिळत आहे. त्यामुळे तरुण , वयोवृद्ध दारू पीत असून त्यांच्यासमवेत अल्पवयीन लहान मुले सुध्दा दारूच्या व्यसनी जात आहे. दारू विक्रेते आपल्या व्यवसाय व्हावा म्हणून गावातील अल्पवयीन मुलांना सुद्धा दारू विकत देत आहे. त्यामुळे गावात भांडण तंटे होत आहे. एवढेच नव्हे तर शासनाने प्रतिबंधित केलेला आणि मानवी आरोग्यास हानिकारक असलेला गुटखा सर्रासपणे दुकानात मिळून येत आहे. राज्यासह जिल्ह्यात गुटखाबंदी असताना सुद्धा गुटखा कसा मिळतो हाच प्रश्न निर्माण होत आहे. तर या सर्व अवैध धंदे हे पोलिसांचे नजरेसमोर होत असून पोलिस याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरीक करत आहे. एकीकडे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत नाही आणि नावापुरती कारवाई झालीच तर त्याला गावाबाहेर नेवून एक हजार रुपये किंवा तोकडी रक्कम घेवून सोडण्यात येते असे खुद्द दारू विक्रेते सांगतात. पोलिसांना दारू विक्री कुठे सुरू आहे हे माहीत असून कारवाई करण्यासाठी गेले असता गावातील काही पोलिसांचे जवळीक असणारे लोक फोन करून आपली व संबधित पोलिसाची आर्थिक पोळी भाजून घेत दारू विक्री करण्यास सोडून देण्यास भाग पाडतात. असे नाव न समोर येण्याच्या अटीवर पोलीस कर्मचारी सांगत आहे. तरी पोलिसांनी असे येणारे फोन घेवूच नये एवढे मात्र खरे! गावात पाण्यासारखी दारू विक्री होत असताना काही लोकांनी पुढाकार घेऊन दारू बंदी करण्यासाठी पाऊल उचलले होते मात्र दारू विक्रेत्यांचे धागेदोरे वरपर्यंत पोहचले असल्याने दारू विक्रेत्यांनी दारू बंदी करणाऱ्या लोकांवर दबाव आणून खोट्या गुन्ह्यात फसवणूक करण्याची धमकी देवून गप्प केले आहे. गावात आणि शेतात गावरान दारूच्या हातभट्ट्या सुरू असून पोलिस मात्र निवडक दारुविक्रेत्यावर कारवाई करतात. दारूमुळे घर संसार उद्धवस्त झाली आहे. येथून जवळ असलेल्या गावात सुध्दा अवैध धंद्यांना उत आला आहे.तसेच एक्का बादशहा रम्मी(जुगार) असे पत्यांचे खेळ पैशाच्या हारजितवर सुरू आहेत. दारू वरली मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जर गावातील दारू विक्री, गुटखा विक्री, वरली जुगार यासह अवैध धंदे बंद न झाल्यास नागरीक लोकशाही मार्गाने आंदोलन करतील असा इशाराही दिला आहे. तर भोसा येथे चोरीचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. काही दिवसापूर्वी गावातून बकऱ्या चोरी गेल्या होत्या. सुदैवाने त्या परत मिळाल्या. मात्र पोलिसांनी या चोरीच्या घटनेवर आळा घाला. गावात नेहमी गस्त वाढवावी. अशी मागणी होत आहे
याकडे जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चवरिया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलीस अधिकारी यामावर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख गीते यांच्यासह डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी तसेच दारूबंदी विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरीक करीत आहे. त्यामुळे “गाव तस चांगलं पण अवैधधंदे दारू विक्री व वरलीमुळे वेशीवर टांगलं” या म्हणीचा प्रत्यय येत आहे.