– दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, तीन ते चार तासानंतर होतेय दर्शन
तुळजापूर (हेमंत चौधरी) – सोमवारी पहाटे तीन वाजेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसातच, कुलस्वामिनी आई श्री. तुळजाभवानी मातेची मूर्ती मंदिरात सिंहासनावर स्थापित करण्यात आली. त्यानंतर अभिषेक पूजा करून दुपारी १२.०० वाजता मंदिराच्या गाभार्यात घटस्थापना करण्यात आली. सात प्रकारचे धान्य, गोमुख कल्लोळातील पाणी, माती याचे मिश्रण करून देवीच्या गाभार्यात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याहस्ते घटस्थापना झाली. यानिमित्त निनादलेला संभाळाचा आवाज, या आवाजात निघालेली आईची मिरवणूक यांनी साक्षात आईचा साक्षात्कार व्हावा, असे दृश्य भरपावसात दिसून आले.
कुलस्वामिनी आई श्री. तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव सोमवारपासून (२६ सप्टेंबर) सुरू झाला. तसेच सोमवारी पहाटे तुळजाभवानी मंदिरात तुळाजाभवानी मातेची मूर्ती सिंहासनावर स्थापित करण्यात आली. तत्पूर्वी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावर यांच्यासह मंदिराचे विश्वस्त आमदार राणा जगजीत सिंह पाटील, तुळजाभवानीचे महंत, पूजारी, मानकरी यांच्या उपस्थितीत घटकलशाची वाजत गाजत आणि जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. गाभार्यात पहाटे ४.०० वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थाचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.
नऊ दिवसांच्या घोर निद्रेनंतर आई तुळजाभावानीचे दर्शन झाल्याने पडत्या पावसात भाविकांनी विधिवत लोटांगण घालून मोठ्या भक्ती भावाने आईचे दर्शन घेतले. महाराष्ट्रासह राज्यातील भाविकदेखील मोठ्या प्रमाणात तुळजापुरात दाखल झाले होते. ज्योत घेऊन जाण्यासाठी तरुण भक्तानींही आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
आज घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी पहाटे तीन वाजेपासून जोरदार पाऊस चालू होता. तर दिवसभर रिपरिप कायम होती. दर्शनासाठी खूपच गर्दी वाढल्याने दोन ते तीन तासाने भाविकांना दर्शन होत होते. तथापि, देवस्थानचे कमिटीने काळजीपूर्वक व्यवस्था केल्याने भाविकांची हेळसांड झाली नाही. आज पहिल्या दिवशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आईला अर्पण केलेले सर्व दागिणे परिधान करण्यात आले. त्यामुळे कुणाची दृष्ट लागू नये म्हणून आज देवीची दृष्ट काढण्यात आली होती. मंदिरातील घटस्थापनेनंतर गावात घरोघरी घटस्थापना करण्यात आली.